Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Pune › माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 12:49AMभोसरी : विजय जगदाळे

नाचू विठ्ठल नामी, रंगू विठ्ठल भजनी एक विठ्ठल नाम, देई आम्हा संजीवनी ।
असा लागला लळा, त्या सावळ्या विठ्ठलाचा जनी, मनी स्वप्नी, भासे सहवास माझ्या विठू सख्याचा ॥

हरिनामाचा जयघोष... टाळ मृदंगाच्या गजरात...भगवे झंडे...वरुणराजाचा  जलाभिषेक... अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आळंदीहून मार्गस्थ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात सकाळी सव्वा आठ वाजता आगमन झाले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालून ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत केले. ट्रस्टच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना दही-दुधाचा अभिषेक करण्यात आला. थोरल्या पादुका ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थेचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, सोहळाप्रमुख अ‍ॅड. विकास ढगे, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांना ट्रस्टच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मल गायकवाड, विनिता तापकीर, रवींद्र भोसले व भाविक मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. थोरल्या पादुका मंदिरातून विधिवत पूजेनंतर सकाळी पावणेनऊ वाजता पालखी मॅगझिन चौकाकडे मार्गस्थ झाली.

सकाळी दहा वाजता पालखीचे आळंदी रोड येथील मॅगझिन चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी खासदार आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गाडवे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडीगेरी, सागर गवळी, विक्रांत लांडे, संतोष लोंढे, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे,  श्रीनिवास दांगट तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेतील कर्मचारी यांनी अभंग गात सोहळ्यात रंगत आणली.

महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पुष्पहार व ताडपत्री भेट देऊन स्वागत करण्यात आले. माऊलींचा पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.