Sun, Jul 21, 2019 01:51होमपेज › Pune › संविधान वाचविण्यासाठी आम्ही सक्षम : आठवले 

संविधान वाचविण्यासाठी आम्ही सक्षम : आठवले 

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

भाजप आरक्षणाला आणि संविधानाला धक्का लावणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष संविधान बचावचा नारा देत आहेत. मात्र संविधान वाचविण्यासाठी पंतप्रधान आणि आम्ही सक्षम आहोत, तुम्ही काँग्रेस वाचवायचे  बघा, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका केली. 

रिपाइंचे राज्यव्यापी अधिवेशन रविवारी पुण्यात पार पडले. या अधिवेशनाला पालकमंत्री गिरीश बापट,  राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  आमदार राहुल कुल, महापौर मुक्ता टिळक,  सीमा आठवले, उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे,  एम. डी. शेवाळे,  भूपेश थुलकर, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, हणमंत साठे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव  यांच्यासह पक्षाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले म्हणाले, भाजप संविधान बदलून आरक्षण रद्द करणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे, संविधानाला धक्का लागला तर मी म्हणेन ती कुर्बानी द्यायला तयार आहे, मला मंत्रिपदाची हाव नाही.

मात्र, काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान बचावासाठी मोर्चे काढणार्‍या राहुल गांधींनी आता काँग्रेस बचाविण्यासाठी मोहीम काढावी, असा टोलाही त्यांनी लगावला. आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने आमच्याबरोबर यावे, अशी आमची भूमिका आहे, मात्र ते नाही आले तरी आम्ही भाजपबरोबरच जाणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पालकमंत्री बापट म्हणाले, अनेकांना चांगले काम पाहवत नाही. त्यामुळे आठवले व भाजपला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. मात्र, आता जनता त्यांना बळी पडणार नाही, कोणीही घटना बदलणार नाही. आरक्षण रद्द करणार नाही. मात्र, सरकार वेळ पडली तर कायदा बदलेल, पण दलितांवर, गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही बापट यांनी दिली. राज्यमंत्री कांबळे यांनी अ‍ॅट्रासिटी कायदा आणखी कडक केला जाईल आश्‍वासन दिले. 

तर आणखी पुरावे शोधा 

कोरेगाव भीमा प्रकरणी दलित समाजाच्या भावना तीव्र आहेत. या प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र, आमच्या भावना तीव्र आहेत, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. पुरावे नसले तर शोध घ्या, आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यातून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, त्यांना उत्तर दिले गेले आहे. अशा शब्दात आठवले यांनी कोरेगाव भीमावर भाष्य केले. मात्र, त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्याचे यावेळी टाळले.