Mon, Aug 19, 2019 05:03होमपेज › Pune › शहरातील जलस्त्रोतांना जलपर्णीची चादर

शहरातील जलस्त्रोतांना जलपर्णीची चादर

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:07AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील जलस्त्रोत असलेल्या मुळा-मुठा नद्या आणि विविध तलाव यांनी सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णीची चादर पांघरलेली आहे. महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून ही जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. मात्र, यंदाचा पावसाळा महिन्यावर येऊन ठेपला असतानाही अद्याप पालिका प्रशासनाने जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले नाही. दुसरीकडे जलपर्णी काढण्यासाठी पारंपरिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने लाखो रुपयांची उधळपट्टी होते. वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत करण्यासाठी स्मार्ट महापालिकेने स्मार्ट यंत्रणेचा उपयोग जलपर्णी काढण्यासाठी करणे गरजेचे आहे.  

शहराचे नैसर्गिक जलस्त्रोत असलेल्या मुळा, मुठा आणि रामनदीवर कात्रज, जांभूळवाडी आणि पाषाण येथील तलावामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते; तसेच अनेक वषार्र्ंपासून टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे आणि राडारोड्यामुळे नद्यांना गटराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी नदीमध्ये बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याठिकाणी नदीप्रवाह जिथे स्थिर होतो, त्याठिकाणाहून काही कि.मी. नदीपात्रात जलपर्णी आच्छादलेली आहे. मुळा नदीमध्ये होळकर पुलापासून अगदी खडकी, औंधपर्यंतचा भाग हा विस्तीर्ण जलपर्णीने व्यापला आहे. मुठा नदीतही शिवणे परिसरात मोठ्याप्रमाणावर जलपर्णी साठून राहीली आहे. संगम पुलापासून बंडगार्डन आणि पुढे मांजरी परिसरातही नदीने जलपर्णीची पांघरलेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर कात्रज आणि पाषाण तलाव आणि रामनदी याठिकाणीही मोठ्या प्रमाणात जलपर्णी अच्छादलेली आहे. 

जलस्त्रोतामधून जलपर्णी बाहेर काढल्यानंतर साधारण आठ ते दहा महिन्यांत ती पुन्हा निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी नदी आणि तलावांमधून जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाते. मात्र ते वेळेत पूर्ण होत नाही. नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वहात येते. ती नदीवरूल पुलांच्या खांबांना आणि लोखंडी पाईपला अडकून राहते. अशावेळी पुन्हा जेसीबीच्या माध्यमातून ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाते. दरवषीर्र्चा अनुभव लक्षात घेऊन ही जलपर्णी पावसाळ्यापूर्वी बाहेर काढून ती इतरत्र हालविणे गरजेचे आहे. मात्र पावसाळा एका महिन्यावर येऊन ठेपला असतानाही पालिका प्रशासन झोपेतच असून अद्याप जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात 
आले नाही. 

स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर कधी होणार?

महापालिका प्रशासन दरवर्षी पारंपारिक पद्धतीनेच जलस्त्रोत आणि जलप्रवाहातील जलपर्णी काढण्यावर लाखो रुपये खर्च करते. ही पद्धत सदोष आणि वेळखाऊ असल्याचे लक्षात आल्यानंतरही पारंपरिक पद्धतीनेच जलपर्णी काढण्याचे काम केले जाते. जलपर्णी काढत असताना नदी पात्रातील घातक प्लास्टिक, अन्य कचरा आणि गाळ मात्र वर्षानुवर्षे तसाच राहतो. त्यामुळे नदी आणि तलावातील पर्यावरण धोक्यात आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विविध प्रकल्प राबवणारी महापालिका जलपर्णी काढण्यासाठी केव्हा स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.