Fri, Feb 22, 2019 10:30होमपेज › Pune › वॉटर व्हेंडिंग मशिन भागवतेय तहान

वॉटर व्हेंडिंग मशिन भागवतेय तहान

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 22 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे स्टेशनवर सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेले वॉटर व्हेंडिंग मशिन प्रवाशांची तहान भागवताना दिसत आहेत. अल्प दरात शुद्ध पाणी मिळत असल्याने प्रवाशांचा ओढा व्हेंडिंग मशिनकडे दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. दररोज सुमारे 6 हजार लिटर पाण्याची विक्री व्हेंडिंग मशिनद्वारे होत असून तब्बल 4 हजार प्रवासी याचा लाभ घेतात, अशी आकडेवारी समोर आली आहे.  

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून घाईगडबडीत पाण्याची बाटली घरी विसरल्यास प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागते. प्रवासी नाईलाजाने 20 रुपयांची एक लिटरची बाटली विकत घेताना दिसतात. मात्र वॉटर व्हेंडिंग मशिनद्वारा अवघ्या 5 रुपयाला एक लिटर व 3 रुपयाला अर्धा लिटर पाणी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळत असून प्रवासी रांगा लावून पाणी विकत घेत असल्याचे दिसते.

दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन मशिन, प्लॅफॉर्म क्रमांक दोन व तीन मिळून एक मशिन, प्लॅटफॉर्म चार व पाचवर दोन अशी एकूण 5 वॉटर व्हेंडिंग मशिन बसविण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्म सहावर मात्र एकही मशिन नसून प्लॅटफॉर्मवरील दुरुस्तीच्या कामाकरिता ते बसविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.