Sun, Feb 17, 2019 09:54होमपेज › Pune › मुळा-मुठातून होणार जलवाहतूक !

मुळा-मुठातून होणार जलवाहतूक !

Published On: Dec 18 2017 2:40AM | Last Updated: Dec 18 2017 1:43AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असतानाच आता शहरातून वाहणार्‍या नद्यांमधून जलवाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या जलमार्ग योजनेत पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. 

रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून जलमार्ग ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी देशातील दहा नद्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेत पुण्यातील नद्यांच्या समावेशासंबंधीचा  प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची सूचना केली होती.  त्यानुसार खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पुण्यातील मुळा-मुठा नद्यांचा समावेश जलमार्ग योजनेत करण्याची विनंती केली होती.

 त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली असून, राज्य शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. आता केंद्राच्या योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न असेल’,  असे शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच मुळा-मुठा नदी सुधारणांसाठी राबविण्यात येत असलेल्या जायका योजनेसाठी सल्लागार नेमण्याची कार्यवाही पूर्ण होईल. त्याचबरोबर आगामी काळात पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येत असून, त्यासाठी कमी पडणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.