Tue, Jul 16, 2019 12:03होमपेज › Pune › टँकर केंद्रावरून ठेकेदाराकडून पाण्याची चोरी

टँकर केंद्रावरून ठेकेदाराकडून पाण्याची चोरी

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 12:40AMउदय पोवार 

येरवडा : महापालिकेच्या येरवडा व वडगावशेरी टँकर पाँईटवरून पाण्याची चोरी करण्याचा प्रकार सुरूच आहे. या टँकर पाँईटवरून ठेकेदार खाजगी अ‍ॅक्वा फिल्टर पाँईट, बांधकामे, खाजगी शिक्षण संस्था, कंपन्या यासह हद्दीबाहेर महापालिकेचे टँकर खुलेआम नेण्याचे सुरूच आहे. दै.पुढारीच्या टीमने दोन दिवस पहाणी केली असता, पुन्हा एकदा महापालिकेच्या पाण्याची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. पाणीपुरवठा अधिकारी, टँकर पाँईटवर काम करणारे कर्मचारी व ठेकेदार यांच्या संगनमताने पाण्याची चोरी होते.उन्हाच्या झळा सर्वत्र बसू लागल्या आहेत. तशी तीव्र पाणी टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. याचाच फायदा  महापालिकेच्या पाण्याचे टेंडर भरणारे ठेकेदार उठवत आहेत. दि.4   रोजी व दि. 6 मार्च दै.पुढारीच्या टीमने पाण्याची चोरी होत आहे का याची  येरवडा व वडगावशेरी टँकर पाँईटवर पाहणी  केली. वेळ सकाळी 9ः21 मिनिटांनी टँकर (नं.एमएच 12, एचडी 6371) हा येरवड्यातील टँकर पाँईटवर पाणी भरून निघाला. सदरचा टँकर चलनवर व डायरीत नमूद केलेल्या ठिकाणी न जाता विमाननगर येथील सिम्बांयोसीस या ठिकाणी गेला. त्याठिकाणी महापालिकेच्या टँकर पाँईटवरून भरून आलेला टँकर खाली केला.

त्याच दिवशी येरवडा पाँईटवरून टँकर (एमएच 12, एचडी 6371) हा दुपारी 3 : 49 मिनिटांनी  भरून निघाला. चलनवर व डायरीत नमूद केलेल्या ठिकाणी खाली न करता विमाननगर येथील हयात हॉटेल शेजारी असणार्‍या व्हॅसकॉन अगस्टा या बांधकामाच्या ठिाकणी टँकर खाली करण्यात आला.दिवशी दि.4 रोजी वडगावशेरी पंपींग स्टेशन येथे टीम पुढारी ने पहाणी केली असता, टँकर (एमएच 12, एचडी 6378) हा सायंकाळी 4ः15 च्या सुमारास घरोंदा वडगावशेरी असा डायरीत उल्लेख करून टँकर थेट टँकर मालकाच्या बॉलीवूड थिएटरसमोर असणार्‍या खाजगी पाणी  फिल्टर प्लँन्टवर पाणी खाली केले. वशेरी पंपींग स्टेशन येथून पाणी भरून सायंकाळी च्या सुमारास टँकर (एमएच 12, एचडी 6373) हा  मनपाच्या शाळेत खाली करण्याचे सांगून थेट टँकर मालकाच्या खाजगी पाणी फिल्टर प्लँटवर खाली केला. 

रोजी वडगावशेरी पंपींग स्टेशन वरून टँकर  सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास (एमएच 12 7561 व 6372) भरून घेवून ठरल्याप्रमाणे टँकर मालकाच्या खाजगी पाणी फिल्टर प्लँटवर खाली केले. अशा प्रकारे खुलेआम पणे महापालिकेच्या पाण्याची चोरी ठेकेदारच करत आहेत. हे टीम पुढारीने वारंवार केलेल्या पहाणीत उघडकीस आले आहे.  वडगावशेरी पंपींग स्टेशन वर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही देखील बंद अवस्थेत आहेत. तर येरवडा स्टेशनवर मीटर सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावले आहे. टँकर पाँईटवरील कर्मचार्‍याला तीनशे रूपये देवून खाजगी ठिकाणी टँकर सर्रास नेले जात आहेत. दिवसातून सुमारे पंचवीसहून अधिक टँकर खाजगी ठिकाणी नेले जात असल्याचे उघड झाले आहे. टँकरना जीपीएस यंत्रणा नाही. ना चोरी उघडकीस आणण्यासाठी  महापालिकेचे पथक नाही. पाणीपुरवठा अधिकारी देखील आर्थिक प्रलोबना पायी  ठेकेदारांना पाठीशी घालत असतात.

टेंडरच्या नावाखाली गरज आहे त्या ठिकाणी न नेता जादा पैसे मिळतात म्हणून खाजगी ठिकाणी महापालिकेचे पाणी विकले जात असून हा प्रकार थांबणे गरजेचे आहे. दै.पुढारीने वर दिलेल्या वेळा व डायरीमध्ये नमूद केलेले ठिकाणाची पहाणी जरी अधिकार्‍यांनी केली तरी पाणी चोरी उघडकीस येईल. ठेकेदार वैयक्तीक खेपा दिवसभरात जास्त करतात. एका-एका ठेकेदाराकडे सहा-सहा टेंडर असल्यामुळे टँकर संख्या जास्त असल्यामुळे कोणी विचारल्यास विहिरीचे पाणी असल्याचे मोगम उत्तरे टँकर चालक देवून वेळ मारून नेत आहेत. तर महापालिकेचे पाणी सांगून विहिरीचे पाणी देखील सर्रास पणे विकले जात आहे. एक टँकर सुमारे तेराशे ते पंधराशे रूपयांना विकला जात आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही टँकर पाँईटवर पाण्याची चोरी असताना महापालिका आयुक्त, लष्कर पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता, बंडगार्डन भागाचे कार्यकारी अभियंता, यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या टँकर मालकांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कार्यकारी अभियंता गणपंत साळुंके यांच्या दै.पुढारीने गेल्या दोन वर्षापासून पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आणून देखील ते गप्प का आहेत. असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

अधिक्षक अभियंता हेमंत देवधर म्हणाले, असा प्रकार होत असेल तर तो चुकीचा आहे. मी अधिकार्‍यांशी बैठक घेवून यावर नक्कीच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कार्यकारी अभियंता गणपंत साळुंके यांच्यांशी संपर्क साधला असता,  ते म्हणाले आपण पहाणी करतो असे नेहमीप्रमाणे उत्तर त्यांनी दिले.