Tue, Apr 23, 2019 05:40होमपेज › Pune › पाण्याची डबकी; डास निर्मितीची केंद्रे 

पाण्याची डबकी; डास निर्मितीची केंद्रे 

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:09AMपिंपरी : प्रतिनिधी 

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या पाण्याची डबकी, कचर्‍याचे ढीग यामुळे डासांच्या उत्पत्तीला चालना मिळते. पावसामुळे डबक्यांची संख्या वाढली आहे. डांसाची उत्पत्ती ही साचलेल्या पाण्यात होत असल्यामुळे वैद्यकीय विभागातर्फे घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी केली जाते. मात्र, शहरातील बांधकामे किंवा इतर पाण्याच्या स्त्रोत यामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही मोठमोठी डबकी ही डास उत्पत्तीची केंद्र बनली आहेत. दरवर्षी डेंग्यू व मलेरियासाख्या आजारांची संख्या पावसाळ्यात वाढत असते. याबाबत प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात वैद्यकीय विभाग कमी पडत असल्याचे चित्र आहे. 

शहरातील काळेवाडी याठिकाणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके तयार झाले आहे. नवी सांगवी येथील मोकळ्या जागेवर दलदल निर्माण होवून जागोजागी पाणी साचले आहे. पिंपळे गुरव या भागात पाणी साचून आजूबाजुला गवत वाढले आहे. रहाटणी याठिकाणी दुषित पाण्याच्या डबक्यामध्ये कचरा, प्‍लास्टिक टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही डबकी सध्या डास उत्पतीची केंद्रे झाली आहेत. पावसाळ्यात डेंग्यू व मलेरिया या आजारास प्रतिबंध घालण्यासाठी वैद्यकीय विभागाने या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे आवश्यक आहे. याबाबत वैद्यकीय विभागाचे सर्वेक्षण कुचकामी ठरत आहे असे दिसून येते. शहरात वाढणार्‍या किटकजन्य आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन  वैद्यकीय विभागाने प्रतिबंधक उपाययोजना वाढविण्याची गरज आहे. शहर परिसराची स्वच्छता आणि प्रतिबंधक उपाययोजना वर्षभर नेहमीच केल्यास डासांच्या निर्मितीलाही पायबंद बसेल.