Mon, Jul 06, 2020 11:31होमपेज › Pune › पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ‘एमआयडीसी’कडून पाणी

पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने ‘एमआयडीसी’कडून पाणी

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:51PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराची तहान   भागवणार्‍या पवना धरणातून शहरासाठी  पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने, पालिका एमआयडीसीकडून (महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ) पाणी घेते. शासनाने ठरविलेल्या दराने पाणी खरेदी केले जाते. या पुढेही एमआयडीसीकडून पाणी घेतल्याशिवाय पालिकेस पर्याय नाही, असे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. 8) स्पष्ट केले; तसेच संपूर्ण शहराच्या  पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीवर होणारा 109 कोटींचा खर्च माफक असल्याचा दावा त्यांनी केला. 

पाणीपुरवठ्यासंदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीवर तब्बल 18 कोटी 45 लाख रुपये खर्चाची बाब शंकास्पद असून, त्याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त  हर्डीकर यांच्याकडे 24 फेब्रुवारीला केली होती. पालिका पवना धरणातून दररोज 470 एमएलडी अशुद्ध पाण्यासाठी जलसंपदा विभागास 2 कोटी 42 लाख दराने 11 कोटी 38 लाख रुपये अदा करते. एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी उचलण्यासाठी 9 कोटी 23 लाख रुपये खर्च करीत आहे. थेट जलसंपदा विभागाकडून पाणी उचलल्यास 8 कोटी 50 लाख रुपयांची बचत होणार असल्याने पालिकेने थेट जलसंपदा विभागाकडून पाणी घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यासंदर्भात ते म्हणाले की, एमआयडीसीकडून पालिका 30 एमएलडी पाणी उचलते. पाण्याची दुसरी व्यवस्था होईपर्यंत एमआयडीसीकडून पाणी उचलण्याशिवाय पर्याय नाही. पवना धरणातून आणि एमआयडीसीकडून पाणी उचलण्याचे दर राज्य सरकारनेच निश्चित केले आहेत.

त्यानुसार पालिका ती रक्कम अदा करीत आहे. जोपर्यंत नवीन ठिकाणाहून पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागणार आहे. पाणीपुरवठ्याच्या देखभाल-दुरुस्तीवर होणारा खर्च माफक आहे. पाणीपुरवठा पंपिंग व शुद्धीकरणासाठी वापरली जाणारे वीज बिल, रॉ वॉटर चार्जेस, पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा  देखभाल-दुरुस्ती खर्च आणि वॉल-खोल बंदचा खर्च, मीटर रीडिंग घेणे व बिलाचे वाटप करणे आदी विविध खर्चांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे हा खर्च  माफक स्वरूपात आहे.