Mon, Jul 22, 2019 13:10होमपेज › Pune › तहानलेले गाव : राजमाची

तहानलेले गाव : राजमाची

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 17 2018 1:18AMलोणावळा :  विशाल पाडाळे 

पुणे- मुंबई या विकसित महानगरांच्या मध्यभागी असलेल्या आणि पर्यटनस्थळ म्हणून नकाशावर प्रसिद्ध असणार्‍या लोणावळा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलाने वेढलेलं राजमाची एक छोटंसं आदीवासी गाव. पारतंत्र्याचा अंधार मिटून भारतीय स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होत असताना हे गाव मात्र अजूनही अंधार्‍या काळोखातच आला दिवस ढकलत आहे. ना वीज, ना रस्ता, ना शाळा, ना दवाखाना आशा समस्यांना तोंड देत जगत असलेल्या या गावापुढे आजमितीला सर्वात मोठी समस्या कोणती समस्या असेल तर ती आहे पाण्याची समस्या.

सह्याद्री डोंगर रांगेच्या कणखर बेसाल्ट खडकावर राजमाची हे गाव वसलेलं असल्याने येथे पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधूनही मिळत नाहीत. लोणावळ्याच्या जवळच असलेल्या या गावात दरवर्षी सरासरी 4 ते 5 हजार मिलिमीटर पाऊस पडतो. येथे पडणारे सर्व पाणी वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी याठिकाणी कोणतीही उपाययोजना अस्तित्वात नाहीत. कारण त्यासाठी आवश्यक जमीन गावाकडे उपलब्ध नाही.

गावठाण आणि लागूनच असलेला अगदी थोडा भाग वगळता बाकी सर्व क्षेत्राला राखीव वनक्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकाम करायचे झाल्यास, किंवा एखादा साधा दगड उचलण्यासाठीही या गावकर्‍यांना वनखात्याच्या दयेवर विसंबून राहावे लागते. किल्ल्यावर पाण्याचे काही साठवण क्षेत्र आहे; मात्र ते ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने, त्या आघाडीवरही ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. गावापासून दीड किलोमीटरवर एक पुरातन तळे आहे. मात्र त्या तळ्यातील पाण्याचा उपयोग गावातील जनावर, तसेच पर्यटक मौजमस्ती करण्यासाठी करीत असल्याने धुण्या भांड्याच्या कामासाठी हे पाणी वापरावे लागते; तसेच हे पाणी खेचून वर आणनेही शक्य नाही, कारण पाण्याच्या पंपासाठी याठिकाणी वीज उपलब्ध नाही.

गावात 23 घरे आणि 150 आसपास लोकसंख्या, त्यातही बरीचशी तरुण मंडळी कामकाजानिमित्त किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लोणावळ्यात वास्तव्यास गेल्याने गावात 50 ते 60 माणसेच वास्तव्यास असतात, अशी या गावाची एकूण रचना. निसर्गाचा वरदहस्त आणि प्रसिद्ध राजमाची किल्ल्याचे नाव लाभल्याने या गावात पर्यटकांची तशी नेहमीच मोठी रेलचेल असते. अपवादात्मक राजकारणी वगळता प्रशासकीय सेवेतील तलाठ्यापासून ते मुख्यमंत्र्यांच्या सचिवापर्यंत आणि अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या गावाला पर्यटक म्हणून भेट देऊन गेलेले आहेत. मात्र गावकरी जगत असलेलं जीवन जवळून बघण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही किंवा मिळूनही त्यांनी त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केल आहे.

अशामध्ये येथील गावकरी राजमाची किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या एका पाण्याच्या कुंडातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. मात्र त्यासाठीही त्यांना सुमारे एक किलोमीटर दूर डोंगरकडा चढून डोक्यावर पाणी आणायला लागते. त्यातही या डोंगरावर माकडांचा वावर असल्याने माकडाने वर कड्यावरून एखादा दगड लोटून देण्याची भीती सातत्याने असते. ग्रामस्थांची ही अडचण येथील यंत्रणेला माहीत नाही असे अजिबात नाही. कारण येथील ग्रामस्थ याबाबत सतत पाठपुरावा करीत असतात.या भागातील आदिवासींसाठी काम करणार्‍या एका संस्थेने येथील लोकांची निकड लक्षात घेऊन पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

गावापासून 200 ते 300 मीटर अंतरावर स्वतःच्या मालकी जागेत एक लाख लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी तयार करून, दूर किल्ल्याच्या कड्या कपारीत असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी सायफन पद्धतीने उचलून ते या टाकीत आणून सोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. संस्थेच्या खर्चातून ग्रामस्थांसाठी बांधण्यात येत असलेल्या टाकीचे काम 70 टक्के पूर्णही झाले. पण पुन्हा एकदा काही सरकारी कायदे दुर्दैवाने गावकर्‍यांच्या नशिबी आडकाठी बनून उभे राहिले आणि पुढील काम थांबले. यावर तोडगा काढण्यासाठी गावकर्‍यांनी विनंत्या करूनही तसेच सरकारी कार्यालये आणि राजकारण्यांचे उंबरे झिजवूनही अद्याप ग्रामस्थांच्या हातात काहीच लागले नाही. पाण्यासाठी वणवण संपण्याची एक आशा गावकार्‍यांच्या मनात या टाकीमुळे निर्माण झालेली ती पुन्हा  मावळून गेली आहे. त्यामुळे सदर गावातील समस्याबाबत नेहमीच लक्ष घालणारे आ. संजय भेगडे हे या प्रश्नावरही वैयक्तिक लक्ष घालतील आणि हे काम मार्गी लावतील अशी आशा येथील ग्रामस्थ बाळगून आहेत.