Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Pune › सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्‍न पेटला

सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्‍न पेटला

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 12:40AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

एकीकडे समान पाणी पुरवठा योजनेची स्वप्ने बघणार्‍या महापालिका प्रशासनाला शहरातील सर्व भागात सुरळीत पाणी पुरवठा करणे अशक्य बनले आहे. शहरातील काही भागात 22 तास तर काही भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून देत गुरुवारी (दि.22 ) झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रशासनावर आगपाखड केली. त्यातच कहर म्हणजे खुद्द महापौरांच्या प्रभागात दूषित पाणी येत असल्याचे समोर आल्याने सभागृह अवाक झाले. 

शहराचा पाणीपुरवठा करताना प्रशासन कोणत्याही प्रकारचे नियोजन करत नाही. त्यामुळे मध्य भाग वगळता इतर सर्व भागात पाणीप्रश्‍न गंभीर आहे. त्यावर अनेक सभासदांनी आक्षेप नोंदवले. भामा आसखेडचा रखडलेला प्रकल्प, पंपिंग स्टेशनला होत असलेला अपुरा पुरवठा, टाक्यांचे रखडलेले बांधकाम, अशा अनेक विषयांवरून प्रशासनावर प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला. 

शहर आणि उपनगरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेण्यात येत आहेत. उपनगरातील पाणीपुरवठ्याचे प्रश्‍न आठ दिवसात क्षेत्रभेट देऊन मार्गी लावले जातील, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली. जलशुद्धीकरण केंद्रांवर किती लोकसंख्या अवलंबून आहे याचे सूक्ष्म नियोजन केले असून त्याचा आढावा मुख्य सभेसमोर मांडण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. त्यातच गायत्री खडसे यांनी महापौर आणि त्यांचा एकच असलेल्या प्रभागात दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर नागरिक प्याले भरून पाणी दाखवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. हा लोकांच्या आरोग्याशी खेळ होतो आहे, असेही त्यांनी सांगितले. समाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नसताना नव्याने समाविष्ट गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी नाराजी माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी व्यक्त केली. 

दर चार-सहा महिन्यांनी सभागृहात पाण्याचा प्रश्‍न चर्चेला येतो. त्यावर प्रशासनाकडून जोपर्यंत कार्यवाही होत नाही, तोवर या विषयावर बोलणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी राग व्यक्त केला .महापौरांच्या प्रभागातच दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब गंभीर असून समान पाणीवाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मांडले. प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे न देता पाण्याचा प्रश्‍न गंभीरतेने सोडवावा, असे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले . अखेर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिरंगाई न करता सर्व नगरसेवकांच्या प्रभागात भेट देऊन पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.यावेळी दिलीप वेडे पाटील, वृषाली चौधरी, वसंत मोरे, सुनील टिंगरे, अनिल टिंगरे, दत्तात्रय धनकवडे यांची भाषणे झाली.