Fri, May 24, 2019 21:22होमपेज › Pune › खडकवासलातून साडेसात टीएमसी जादा पाणी सोडले

उजनीत पुण्याला सहा महिने पुरेल एवढे पाणी

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:37AMखडकवासला ः वार्ताहर

गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस पडल्याने   पुणेकरांना सहा महिने पुरेल इतके पाणी  खडकवासला धरणातून मुठा नदीद्वारे उजनी धरणात तसेच मुठा कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल साडेसात टीएमसी जादा पाणी खडकवासलातून सोडण्यात आले आहे. 

अद्याप  पावसाचे जवळपास दोन महिने बाकी असल्याने जादा पाणी सोडले जाणार आहे. धरणसाखळीत जादा  पाणी साठवण्याची क्षमता नाही. त्यामुळे दरवर्षी जादा पाणी सोडले जात आहे. गेल्या वर्षी जवळपास दहा टीएमसी जादा पाणी सोडले होते. यंदा अर्ध्या पावसाळ्यातच साडेसात टीएमसी जादा पाणी सोडावे लागले.

खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता आर. बी. व्यवहारे म्हणाले, जुलैच्या पावसाने खडकवासला लवकर भरले. त्यानंतर पानशेत भरले. टेमघरमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे खडकवासलामध्ये येणारे जादा पाणी मुठा नदी तसेच मुठा कालव्यात सोडले जात आहे. 

खडकवासला धरणाच्या साठवण क्षमतेच्या    चार पट  इतके साडेसात टीएमसी   जादा पाणी सोडावे लागले. खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता अवघी 1.97 टीएमसी इतकी आहे. चार धरणाच्या खडकवासला धरणसाखळीची एकूण पाणी साठवण क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. टेमघर धरणाच्या गळतीमुळे टेमघरमधे जेमतेम 1.71 टीएमसी पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे टेमघरमध्ये यंदा शंभर टक्के पाणी साठा होणार नाही.

खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेल्या  पाण्याचा लाभ उजनी धरणाला तर दोन टीएमसीचा लाभ हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतीला होत आहे. गळतीमुळे टेमघरमधून पाणी सोडले जात आहे. पानशेत   शंभर टक्के भरून वाहत आहे. तर सर्वात मोठे वरसगाव शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव  85.86   टक्के भरले आहे.  खडकवासला शंभर टक्के भरून वाहत असल्याने जादा पाणी मुठा नदीत 1712 तर  कालव्यातून पूर्ण क्षमतेने 1355 क्युसेक पाणी  सोडले जात आहे. 

पानशेत शंभर टक्के तुडुंब भरले आहे. त्यामुळे पानशेतमधून 620 व 495  क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर टेमघर धरणातून 680 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. या पाण्याची भर खडकवासलात पडत आहे. याशिवाय धरणक्षेत्रातील नद्या, ओढे, नाल्यातून पाण्याचे प्रवाह सुरु आहेत. त्यामुळे पावसाचा जोर ओसरूनही खडकवासलात पाण्याची आवक सुरू आहे.
धरणसाखळीत 25.79  टीएमसी म्हणजे 88.52 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत  एक  टीएमसीपेक्षा   जादा पाणी आहे. गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2017 रोजी धरणसाखळीत 24.64 टीएमसी म्हणजे 84.52 टक्के इतका पाणीसाठा होता.

दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाळी वातावरण कायम आहे. डोंगरी भागात पावसाच्या हालक्या सरी तर धरणमाथ्याच्या खाली तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.गेल्या 24 तासांत टेमघर येथे 29 मिलिमीटर तर वरसगाव  येथे  6 ,पानशेत येथे 4  मिलिमीटर पाऊस पडला.