Wed, Oct 16, 2019 20:20होमपेज › Pune › पुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन

पुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी 

पुणेकरांनी यापुढे पाणी जपून वापरावे, असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिला. पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून जास्तीत-जास्त पाण्याचा पुनर्वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. खडकवासला धरणातून शहरासाठी ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिकेकडून उचलण्यात येते. हे जास्तीचे पाणी नेमके कोठे जाते? त्या पाण्याची कोणी चोरी करतेय का? याचा शोध घेण्यासाठी पालिकेने शहराच्या पाणीवापराचे लेखापरीक्षण करावे; अशी सूचनाही महाजन यांनी केली. 

महापालिकेतर्फे पर्वती जलकेंद्र येथे साकारलेल्या 500 एमएलटी जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी महाजन बोलत होते.     

या वेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचीही भाषणे झाली. महापौर मुक्‍ता टिळक यांनी प्रास्ताविक केले, तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले. 

या प्रसंगी महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, महापालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख विजय कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. 

पुणेकरांना खलनायक ठरवू नका...

शहर वाढत असताना जलसंपदा विभागाने वाढीव पाण्याची मागणी पूर्ण न करताच पुणेकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. भाजपमध्येच पाणीमाफिया आहेत. कोण पाणी चोरते, याचा मंत्रिमहोदयांनी अभ्यास करावा. माहिती न घेताच पुणेकरांना खलनायक ठरवू नये. ज्यांनी शहरासाठी निधी देण्यास नकार दिला, त्यांनी पुणेकरांवर बोलू नये, अशी टीका विरोधी पक्षांनी महाजन यांच्यावर केली आहे.