Wed, Apr 24, 2019 21:29



होमपेज › Pune › रुग्णालयांवर राहणार ‘वॉच’

रुग्णालयांवर राहणार ‘वॉच’

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:59AM



पुणे : प्रतिनिधी 

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेली  रुग्णालये आणि  दवाखान्यांवर  बोर्ड प्रशासनाच्यावतीने  वॉच ठेवण्यात येणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय समिती ही पाहणी करणार आहे. या पाहणीमध्ये रुग्णालयांची नोंदणी, कागदपत्रे, डॉक्टरांची प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. त्यानंतर बोर्डाच्या कार्यालयाकडे अहवाल सादर केला जाणार आहे, 

बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार  कँटोन्मेंटच्या हद्दीत असलेली रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखान्यांनी प्रशासनाकडे  नोंदणी करणे बंधनकारक आहे. मागील वर्षापासून या भागात असलेल्या कित्येक रुग्णालयांची नोंदणी बोर्ड प्रशासनाकडे  नाही. याबाबतचा वर्षभरापूर्वी बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. याबाबत  बोर्डाच्या बैठकीत सादर झालेल्या अहवालात, अनेक खासगी रुग्णालयात रुग्णांसाठी लिफ्ट नाही, आवश्यक सोयी-सुविधा नाहीत, बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणाही नाही. अनेक ठिकाणी अस्वच्छता, नोंद नसणे आदि बाबी उघडकीस आल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयांची नोंदणी करण्याचे  घेण्याचे आदेश बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी यांनी दिले होते.

त्यानुसार, बोर्डाने 130 आरोग्य सेवा आस्थापनांना ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत नोटीसा बजावून बोर्डाकडे नोंदणी करण्याचे आदेश दिले होते.या आठवड्यापासून समितीच्यावतीने  हद्दीतील रुग्णालये, दवाखान्यांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर  नोंदणीचा अहवाल बोर्ड प्रशासनाकडे सादर होणार आहे. असे रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी सांगितले.