Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडवर पालिका ‘कंट्रोल रूम’मधून वॉच

पिंपरी-चिंचवडवर पालिका ‘कंट्रोल रूम’मधून वॉच

Published On: Feb 19 2018 1:37AM | Last Updated: Feb 19 2018 1:14AMपिंपरी : मिलिंद कांबळे

तब्बल 25 लाख लोकसंख्येची पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी तब्बल 750 किलोमीटर अंतर भूमिगत ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंट्रोल व कंमाड रूमद्वारे (सिटी ऑपरेशन सेंटर) ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. ही यंत्रणा 24 तास कार्यरत असल्याने एखाद्या ठिकाणी अधिक तातडीने मदत पोहचविणे शक्य होणार आहे. विकसित देशातील ही अद्ययावत यंत्रणा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसह खबरदारी, विविध सोई-सुविधा आणि जनजागृतीसाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. 

संपूर्ण शहराची 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची भौगोलिक रचनेनुसार ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे पसरविले जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने शहरातील निश्‍चित केलेल्या वेगवेगळे चौक, पालिका कार्यालये, बसथांबे, बाजारपेठ, उद्यान आदी गर्दीच्या ठिकाणी अद्ययावत असे 600 सीसीटीव्ही फिरते कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍याद्वारे पालिकेच्या कंट्रोल रूममधून शहरातील प्रत्येक पादचारी व वाहनांवर ‘वॉच’ असणार आहे. एखाद्या संदिग्ध व्यक्ती किंवा वाहनाबाबत ‘अ‍ॅलर्ट’ प्राप्त होताच तत्काळ उपाययोजना केली जाईल.  

‘स्मार्ट किऑस्क’द्वारे जवळचे वायफाय सेंटर, पालिका व क्षेत्रीय कार्यालय, पोलिस ठाणे, स्वच्छतागृह, महावितरण, शाळा, महाविद्यालय, रूग्णालय, चित्रपटगृह, बस, मेट्रो व रेल्वे स्थानकाचा शोध घेता येणार आहे. तसेच, तक्रारीही नोंदविता येणार आहेत. नागरिकांना शहरातील 300 ठिकाणी मोफत ‘वायफाय’चा लाभ घेता येईल. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘स्मार्ट सिग्नल’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी कमी-जास्त होईल. आपत्कालीन वेळेत किंवा अति महत्त्वाच्या व्यक्तींस मार्ग रिकामा करून देण्यासाठी तेथील सर्व सिग्नलचे दिवे काही सेकंदात हिरवे केले जातील. परिणामी, त्वरित मदत कार्य उपलब्ध होईल. 

स्मार्ट सेवेमुळे नागरिक सुखावणार

‘स्मार्ट वॉटर’मध्ये प्रत्येक नळजोडच्या मीटरच्या विशेष चीपमुळे त्यांचे आपोआप रीडिंग उपलब्ध होणार आहे. स्मार्ट बस थांब्यामुळे मार्गावरील बसची संपूर्ण माहिती मिळेल. ‘स्मार्ट मोबाईल अ‍ॅप’मध्ये महापालिका व शहरासंदर्भातील इत्यंभूत माहिती असेल. ‘स्मार्ट सिव्हेज’मध्ये कचरा वाहतूक वाहने जीपीएस ट्रेकिंग सिस्टीमने जोडण्यात येणार असल्याने कचरा नियमितपणे उचलला जाणार आहे. ‘स्मार्ट स्ट्रिट लाईटींग’मध्ये सध्याचे अधिक वीज वापरणारे पथदिवे बदलून ते एलपीजीचे अधिक प्रकाश देणार असतील. गरजेनुसार दिव्याची प्रखरता कमी व अधिक करून नियंत्रण ठेवले जाईल. परिणामी, मोठी वीज बचत होईल.