होमपेज › Pune › स्वच्छ सर्वेक्षणाची ‘ऐशी-तैशी’

स्वच्छ सर्वेक्षणाची ‘ऐशी-तैशी’

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 17 2018 11:42PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणाचा डांगोरा पिटला आहे; मात्र शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छताविषयक जनजागृती केवळ जाहिरातीतच दिसत आहे. प्रत्यक्ष शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा साचलेला आहे, तर काही ठिकाणी चेंबरमधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छ सर्वेक्षणाची ‘ऐशी-तैशी’ झाल्याची स्थिती आहे.  शहरात स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे; परंतु शहरात मात्र ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. गटारे, नाले घाण सांडपाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.

नदीपात्रालगत व नदीपात्रात प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे, याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ते केवळ जाहिरातबाजीत व्यस्त असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या अस्वच्छतेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शहरातील नागरिकांतून येत आहे. पिंपरी भाटनगर येथील गटारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

चिखली-कुदळवाडी रस्त्यावरील चेंबरमधील सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगलनगर-थेरगाव येथे रस्त्यावरच कचरा फेकून दिलेला आहे. हा कचरा उचलणे गरजेचे असताना महापालिकेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करत आहे. वाकड-म्हातोबानगर येथील नाल्याच्या परिसरात कचरा फेकून दिला आहे. पिंपरी एमआयडीसी एच ब्लॉकमध्ये कचराकुंडी ठेवण्यात आली आहे; मात्र त्यामध्ये नागरिक कचरा टाकताना दिसत नाहीत. या परिसरात देखील रस्त्यावरच कचरा टाकून दिला जात आहे. 

पिंपरी भाजी मंडईमध्ये देखील कचर्‍याची समस्या नित्याचीच झाली आहे. या ठिकाणी  अनेक वेळा घंटागाडी येत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पवना नदी घाट चिंचवड, वाल्हेकरवाडी, रिव्हर रोड आदी भागातील नागरिकही कचर्‍याच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. महापालिका केवळ स्वच्छ सर्वेक्षणाचा दिखावा करत आहे; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती उलटीच असल्याचे चित्र आहे.