होमपेज › Pune › शहर स्वच्छतेसाठी ‘जटायू’ आणि ‘पुष्पक’

शहर स्वच्छतेसाठी ‘जटायू’ आणि ‘पुष्पक’

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:47PM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरातील सफाई काम अधिक सुलभ करण्यासाठी ‘जटायू’ हे ‘व्हॅक्यूम क्लिनर’सारखे आणि कचरा संकल व वाहतुकीसाठी विजेवर चालणारे वायू व ध्वनी प्रदूषणविरहीत ‘पुष्पक’ वाहन विकसित करण्यात आले आहे. या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या वाहनांच्या सहाय्याने शहर स्वच्छता कामास गती दिली जाणार आहे. त्यातून महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होईल, असा दावा केला जात आहे.  

‘जटायू’ हे वाहन घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे घंटागाडी आकाराचे छोटेसे वाहन आहे. त्याची प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती केली गेली आहे. या वाहनात 500 लिटर क्षमतेची पिशवी आहे. रस्त्यावर पडलेल्या प्लॉस्टिक बाटल्या, कागद, कचरा एका प्लॉस्टिक पाईपमधून शोषून घेतला जातो. 50 ते 70 किलो वजनाचा कचरा एका वेळी उचलला जातो. हा कचरा रिकामा केल्यानंतर पुन्हा नव्याने कचरा उचलला जाऊ शकतो. 

हे वाहन आकाराने छोटे असल्याने ते अरुंद रस्त्यावरूनही सहज कचरा जमा करू शकते. हा कचरा केवळ एक व्यक्ती सहजपणे उचलू शकते. त्यासाठी सहायकाची गरज लागत नाही. या वाहनाचे प्रात्यक्षिक बुधवारी (दि.10) महापालिका भवनाच्या परिसरात करण्यात आले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्षा सीमा साळवे, सह आयुक्त दिलीप गावडे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, आरोग्य विभागाचे प्रमुख मनोज लोणकर आणि नगरसेवक उपस्थित होते. वाहन कंपनीचे संचालक संतोष जाधव यांनी प्रात्यक्षिक केले. 

महापालिकेच्या मागणीनुसार शहरात स्वच्छता कामासाठी सदर वाहनांची निर्मिती करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले. तर, विजेवर चालणार्‍या या ‘ई-लोडर’ (पुष्पक) तीनचाकी वाहनातून कचरा वाहतूक केली जाते. हे वाहन विजेवर चालणारे असल्याने प्रति किलोमीटरला केवळ 40 पैसे खर्च येतो. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर हे वाहन 120 किलोमीटर अंतर ताशी 25 किलोमीटर वेगाने धावते. या वाहनातून 500 ते 700 किलो ओला व सुका कचरा संकलन व वाहतूक करता येते. पुष्पक वाहन वजनास हलके असल्याने ते महिलाही चालवू शकतात. पुष्पकचा कचरा संकलन व वाहतुकीस वापर केल्यास महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. 

या वाहनाचे प्रात्यक्षिक प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर व अधिकार्‍यांना गुरुवारी (दि.11) देण्यात आले. पेपीएस टूल्सचे संचालक संतोष इंगळे यांनी वाहनांची माहिती दिली. या वाहनावर हायड्रॉलिक यंत्रणा असल्याने डंपरमधील कचरा खाली करता येतो. त्यामुळे कचरा हाताळावा लागत नाही. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या वाहनाची निर्मिती शिरूर येथे केली जात आहे. या वाहनांचे प्रात्यक्षिक पाहून महापालिकेचे अधिकारी प्रभावीत झाले. गतिमान आणि सुलभ सफाई कामासाठी अशाप्रकारे इको फ्रेंडली वाहनांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.