Thu, Aug 22, 2019 12:36होमपेज › Pune › सत्ताधार्‍यांचे बचतीचे धोरण वार्‍यावर

सत्ताधार्‍यांचे बचतीचे धोरण वार्‍यावर

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 10:47PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी 25 महागडे मोबाईल हॅन्डसेट खरेदी करण्यात आले आहेत. वीस हजारांचा एक असे तब्बल 5 लाख रुपये खर्च करून ही मोबाईल खरेदी करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपने काटकसरीचे धोरण स्वीकारून अनेक खर्चांना फाटा देऊन बचतीचे धोरण स्वीकारले आहे, असे असताना पदाधिकारी व अधिकार्‍यांसाठी 5 लाखांचे मोबाईल खरेदीवर उधळपट्टी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

पालिका प्रशासनाने मोबाईल खरेदीसाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात 3 निविदा प्राप्त झाल्या. भोसरीतील इंदू इन्फोटेक सोल्युशनकडून सॅमसंग कंपनीने 25 मोबाईल हॅन्डसेट एकूण 4 लाख 96 हजार 125 रुपयांना पालिकेने खरेदीस मान्यता दिली आहे. निविदा दरापेक्षा हे दर 0.05 टक्केने कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. एका मोबाईलचा दर 19 हजार 845 रुपये आहे. सदर मोबाईल खरेदीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. हा विषय बुधवारी (दि.11) होणार्‍या स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे. 

सत्ताधारी भाजपने पालिकेच्या विविध खर्चिक उधळपट्टीला लगाम लावला आहे. त्या अंतर्गत मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेण्याऐवजी तो पालिकेच्या प्रेक्षागृहात घेणे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छऐवजी पुस्तक व पालिका उद्यानातील रोप देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमांची निमंत्रणपत्रिका न छापता झेरॉक्स प्रती देण्याची पद्धत सुरू केली आहे. तसेच, दरवर्षी छापण्यात येणारी दैनंदिनी (डायरी) न छापण्याचा निर्णय घेतला आहे. 

कार्यक्रमासाठी भव्य मंडप व इतर भरमसाट खर्चाला फाटा दिला आहे. तसेच, नाले सफाईसाठी निविदा प्रक्रिया न राबविण्याचा ठराव केला आहे. एकीकडे विविध प्रकारे खर्चिक कामांना लगाम लावला आहे. त्यातून बचत केली जात आहे.  असे असताना पालिका पदाधिकारी व पदाधिकार्‍यांना महागडे मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बचतीचे धोरण गुंडाळले की काय असा सवाल नागरिकांना पडला आहे.