Wed, Apr 24, 2019 07:35होमपेज › Pune › दिवे घाटाचा अवघड टप्पा पार

दिवे घाटाचा अवघड टप्पा पार

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMसासवड : जीवन कड

‘या या दिव्याच्या घाटात, माउली चालती थाटात...’ या रचनेप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवजनांसह माउली नामाच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात दिवे घाटाची अवघड चढण चढून सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास पुरंदर तालुक्यात दाखल झाला. घाटावर उपस्थित हजारो माउली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवाला.

यावेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माउलींच्या पालखी रथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात माउलींचे स्वागत करण्यात आले.  पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक माउलींच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी थांबले होते. सायंकाळी सव्वापाच वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी साडेपाच वाजता पालखी विसावली.

यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजीमंत्री दादा जाधवराव, बबनराव पाचपुते, मनसेचे बाबा जाधवराव, पै. दत्ता गायकवाड, दौंड - पुरंदरचे उपविभागीय अधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांसह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी गावकर्‍यांनी सोहळ्याचे स्वागत करीत दर्शनाचा लाभ घेतला. 

माउलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकर्‍यांच्या चार बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली. माउलींचा पालखी रथ शेवटचा टप्पा ओलांडून पुरंदरच्या हद्दीत प्रवेश करताना माउली... माऊली ... नामाचा जयघोष, फुलांची उधळण आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात माउलींचे स्वागत करण्यात आले. यानंतर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काहीवेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारकर्‍यांनी घाटमाथ्यावर काहीवेळ विश्रांती घेतली. 

पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकर्‍यांसाठी पाणी, चहा, फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वहातूक व्यवस्था पहात होते. अनेक ठिकाणी वारकर्‍यांच्या  सेवेसाठी औषधांची, पाणी पुरवठ्याची सोय केली होती. यंदाही तरुणाईचे प्रमाण जास्त दिसत होते.