पुणे : प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाने काळानुरूप बदलले पाहिजे, समाजाशी नाळ जोडली पाहिजे. सामाजिक कामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन संतांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
आम्ही वारकरी त्रैमासिक, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, चोपदार फाउंडेशन, वारकरी सेवा संघ आणि व्यसनमुक्त युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय संतविचार अभ्यासवर्गाचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे, खजिनदार महेश सूर्यवंशी, ‘क्रिडाई’चे प्रफुल्ल तावरे, राजाभाऊ चोपदार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अन्वयार्थ पुण्यात प्रार्थना समाजाने लावला. बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांच्यासारख्या व्यासंगी अभ्यासकाने तुकोबारायांच्या अभंगावर मोठे काम केले. परंतु आपल्याकडे गेल्या शंभर वर्षांत वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणार्या शिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम बदललेला नाही. काळानुसार यात बदल झाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे वारकरी कीर्तनकारांनी केवळ संत विचारांची शिकवण न देता संतविचार प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजेत.
सामाजिक कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला पाहिजे. तसे न झाल्याने वारकरी संप्रदाय समाजापासून काहिसा दूर गेला आहे. सध्या आपल्याकडे हजारो बुवा महाराजांचे प्रस्थ वाढले आहे. याचे कारण आपण समता, बंधुतेचे वारकरी विचार पोचवण्यात कमी पडत आहोत, हा वारकरी संप्रदायाचा नैतिक पराभव आहे, अशी खंतही डॉ. मोरे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ चोपदार यांनी केले, सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले.