Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Pune › ‘एटीएम बंद’चा ‘वॉलेट’ कंपन्यांना फायदा

‘एटीएम बंद’चा ‘वॉलेट’ कंपन्यांना फायदा

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:39AMपुणे :  गेल्या 18 एप्रिलला बँकांचे एटीएम मशिन्स बंद असलेल्याचा फायदा डिजिटल व्यवहार करणा-या कंपन्यांना झाला. पेटीएम, मोबिक्विक आणि फ्लिपकार्ट या मोबाईल वॉलेट कंपन्यांना ऑनलाईन व्यवहारांचा या दिवशी सर्वाधिक फायदा झाला.

पेटीएमच्या वन 97 कम्युनिकेेशन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याच्या तुलनेत या दिवशी संपूर्ण देशभरात ऑनलाईन व्यवहारांमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली. यात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांत वाढ झाली. रोख रकमेच्या टंचाईमुळे ग्राहकांनी आमच्या सेवेचा लाभ घेतला. ऑनलाईन व्यवहारांत अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून ज्या शहरांमध्ये एटीएम बंदावस्थेत होती, तिथे सर्वाधिक फायदा झाल्याचे पेटीएमचे सीओओ किरण वसिरेड्डी यांनी सांगितले. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील अंदाजे 2.2 लाख बँकांच्या एटीएममध्ये   रोख रक्कम सुरळीत करण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ग्राहकांना मुबलक प्रमाणात रोख एटीएममध्ये उपलब्ध आहे, असा दावा रिझर्व्ह बँकेने केला आहे.असे असले तरीही, अजूनही रोखीच्या वाढत्या मागणीमुळे बिहार, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकाच्या काही भागातील एटीएम आणि बँकांमधील रोकड पूर्णपणे संपली आहे. 

यासंदर्भात मोबिक्विक कंपनीचे अध्यक्ष उपासना टाकू म्हणाल्या की, एटीएममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्राहक त्यांच्या व्यवहारांसाठी मोबाईल वॉलेटचा वापर करण्याकडे कल वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून डिजीटल पेमेंट्सच्या व्यवहारात 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवायसी किंवा ई-केवायसी विनंतीसाठीच्या अर्जासाठी 33 टक्के वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Tags : Pune, Wallet, companies, benefit, close, ATM