Thu, Apr 25, 2019 23:32होमपेज › Pune › चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला..!

चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला..!

Published On: Jul 06 2018 1:45AM | Last Updated: Jul 06 2018 1:43AMआळंदी : वार्ताहर

चालला गजर जाहलो अधीर 
लागली नजर कळसाला 
पंचप्राण हे तल्लीन 
आता पाहीन पांडुरंगाला 

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी कैवल्याचा पुतळा माउलींना घेऊन जाण्यासाठी राज्यभरासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले असून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्या 187 व्या पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजेच शुक्रवारी (दि. 6) दुपारी चारच्या दरम्यान प्रस्थान होत आहे. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, प्रस्थानदरम्यान कळस हलतो अशी भाविकांची भोळी श्रद्धा असून, प्रस्थानवेळी हजारो भाविकांची नजर कळसाकडे असणार आहेत. 

प्रस्थान दिवशी पहाटे पावणेतीन ते साडेचार यावेळी घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक होईल.साडेचार ते दुपारी बारा भाविकांच्या महापूजा व समाधी दर्शन. दुपारी बारा ते साडेबारा श्रींना नैवेद्य आणि भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल. दुपारी साडेबारा ते दोन भाविकांना पुन्हा समाधी दर्शन खुले होईल.  प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश देतील. या दरम्यान माउलींना पोशाख चढविण्यात येईल. तदनंतर वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत माउलींच्या पादुका ठेवण्यात येतील. संस्थानाच्या वतीने मानकर्‍यांना मानाची पागोटी वाटप केले जाईल.  मंदिर प्रदक्षिणा करत पालखी खांदेकरी नाचत-गात महाद्वारातून मंदिराबाहेर आणतील. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर समाज आरती होऊन पालखी नवीन दर्शनबारी मंडपात (गांधीवाडा) येथे विसावेल. शनिवारी (दि. 7) रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.

माउलींच्या पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम

पहाटे 2.45 ते 4.30 घंटानाद, काकडा आरती व पवमान अभिषेक.

पहाटे 4.30 ते दुपारी 12 भाविकांच्या महापूजा व समाधीदर्शन.

दुपारी 12 ते 12.30 श्रींना नैवेद्य आणि भाविकांना दर्शन बंद.

दुपारी 12.30 ते 2.00 भाविकांना पुन्हा समाधी दर्शन खुले.

दुपारी 2 नंतर प्रस्थान कार्यक्रमासाठी देऊळवाडा स्वच्छ करण्यात येईल. 

दुपारी 3.30 च्या दरम्यान  प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47  दिंड्यांना मंदिरात प्रवेश. यादरम्यान माउलींना पोशाख चढविण्यात येईल.

दुपारी 4.00 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात.