Wed, Apr 24, 2019 21:45होमपेज › Pune › सकाळी चालत या; दूध पाच रुपये स्वस्त घ्या

सकाळी चालत या; दूध पाच रुपये स्वस्त घ्या

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 17 2018 11:57PMशिरगाव : बद्रीनारायण लेंडगुळे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तो विविध व्याधीने ग्रासून जातो. व्याधी मागे लागल्यावर आपसूचक तो दवाखान्याची वाट धरतो. परंतु धकाधकीच्या जीवनातही व्यक्तीने वेळच्यावेळी शरीराकडे लक्ष दिल्यास आजारांना दूर ठेवता येते. यासाठी व्यायाम आवश्यक आहे. आजार आपल्यापासून दूर रहावेत, यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग असावे, असा उद्देश ठेवून सोमाटणे येथील एका युवकाने नामी शक्कल लढविली आहे. संतोष मुर्‍हे या दुग्ध व्यावसायिकाने ‘सकाळी आठच्या आत चालत या, दूध पाच रूपये स्वस्त घ्या’ असे आवाहन परिसरातील रहिवाशांना त्याने केले आहे.  

डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सांगण्यानुसार सकाळच्यावेळी पायी चालणे शरीरास हितकारक असते. त्यामुळे अनेक व्याधींना आपल्यापासून दूर ठेवता येते. ही गोष्ट ध्यानात घेऊन संतोष मुर्‍हे यांनी परिसरातील रहिवाशांना पायी चालण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सकळी आठ वाजण्यापूर्वी डेअरीमध्ये पायी चालत आल्यास त्या ग्राहकाला नेहमीच्या दरापेक्षा दूध लिटरमागे पाच रूपये कमी भावात देण्याचे ठरविेल आहे. संतोष हिरामण मुर्‍हे यांचा सोमाटणे येथे दूध विक्रीचा व्यवसाय आहे.  या व्यवसायाबरोबर त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. या जाणीवेतून त्यांनी एक नवीन योजना आखली सोमाटणे आणि आजूबाजूच्या वस्त्यांवरून  कोणीही सकाळी आठ वाजण्यापूर्वी पायी चालत आल्यास त्या ग्राहकाला 5 रुपये स्वस्त दूध विकेले जाईल. 

या विषयी मुर्‍हे यांना विचारले असता, माणूस सकाळी दूध घेण्यासाठी चालत आल्यास आपोआप त्यास दिवसभराचा व्यायाम घडेल. जेणेकरून दिवसभराची ऊर्जा त्याला या व्यायामातून मिळेल. परिसरातील रहिवाशांनी जाणीवपूर्वक सकाळी पायी चालणे ठेवल्यास त्यांना निश्‍चितच शारीरिक तसेच आर्थिक फायदा होईल. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे त्यांना मिळणारा आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. 

मुर्‍हे यांनी सांगितले की, सध्या सोमाटणे हे ठिकाण आजूबाजूच्या गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. सोयी सुविधा हाकेच्या अंतरावर असल्याने येथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. परिसरात विविध कंपन्यात कामास असणारा कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कामाच्या व्यापात संबंधितांना व्यायाम करणे जमत नाही, तर काहीजण आळस करतात. हा आळस घालवायचा असेल तर अशा योजना परिणामकारक ठरतील,  असा विश्वास मला वाटतो. लोकांनी पैसे वाचवण्यासाठी का होईना; परंतु पायी चालले पाहिजे. लोकांचे आरोग्य सुधारावे हाच या योजने मागचा उद्देश आहे.

Tags : Pimpri, Walk, morning, Take, five, bucks, milk, cheap