Mon, Apr 22, 2019 12:13होमपेज › Pune › ‘टेमघर’च्या ठेकेदाराला दोन कोटींचा दंड माफ

‘टेमघर’च्या ठेकेदाराला दोन कोटींचा दंड माफ

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:21AMखडकवासला: दत्तात्रय नलावडे

 पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिक व हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या टेमघर धरणाचे कोट्यवधी रुपये खर्चाचे दुरुस्तीचे कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निरीक्षण गुणवत्ता दक्षता पथकाने नोंदवले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य व निकृष्ट काम करणार्‍या संबंधित ठेकेदाराला जलसंपदा विभागाने दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता; मात्र दर्जेदार कामासाठी कारवाईचा बडगा उचलणारे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हणुमंत धुमाळ यांची तडकाफडकी बदली करून  मोठ्या रकमेच्या दंड माफीचा अधिकार नसलेले कार्यकारी अभियंता सुनील प्रदिक्षणे यांनी दोन कोटी रुपयांचा दंड माफ करून ठेकेदाराला अभय दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारावरून भाजप-सेनेचे युती सरकार प्रारदर्शक कारभाराचा डांगोरा वाजवत असताना टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामात पारदर्शक कारभाराला मूठमाती दिल्याचे चित्र पुढे आले आहे. 

टेमघर धरणाचे बांधकाम 1995 मध्ये सुरू करण्यात आले. धरणाच्या भिंतीचे काम पायापासूनच निकृष्ट दर्जाचे झाल्याने सुरुवातीपासून धरणातून होणार्‍या प्रचंड प्रमाणातील पाण्याच्या गळतीचा प्रश्‍न उभा आहे. अनेक वादात धरणाचे काम रखडले. अखेर 2011 मध्ये धरणाचे काम कसेबसे पूर्ण करण्यात आले; मात्र पाण्याच्या गळतीने उग्र रूप धारण केले; त्यामुळे धरणास मोठा धोका असल्याचे समोर आले.

निकृष्ट दर्जाच्या टेमघर धरणात क्षमतेइतका 3.71 टीएमसी पाणीसाठा होणार नाही; तसेच गळतीमुळे भिंत कमकुवत होऊन धरणाचे अस्तित्वच नष्ट होईल, तसेच धरण उंचीवर असल्याने धरण फुटल्यास वेगाने पाणी खडकवासलातून पुणे शहर व परिसरात येऊन मोठे संकट उभे राहणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन धरणास असलेला संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाने समिती नेमली. गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीचे काम योग्य दर्जाचे करावे असा अहवाल समितीने सादर केला. त्यानंतर जलसंपदा विभागाने सन 2016 मध्ये 100 कोटी रुपये खर्चाचा धरणाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार केला. सन 2017 मध्ये त्यांसदर्भात निविदा काढून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. 100 कोटी रुपयांची एकूण तीन दुरुस्तीची निविदा एकाच ठेकेदाराला मिळाली.

धरणाच्या जवळपास एक किलोमीटर अंतर लांबीच्या मुख्य भिंतीला अनेक ठिकाणी भगदाड आणि गळतीची ठिकाणे आहेत. 30 मीटर अंतराची अशी 27  गळतीची ठिकाणे निश्‍चित करून, दर्जेदार सिमेंट, फ्लायअ‍ॅश व सेलीकॉन यांचे मिश्रण स्वयंचलित मशिनने योग्य प्रमाणात वजन करून स्वयंचलित मशिनच्या सहाय्याने गळती होणार्‍या ठिकाणी ओतले जावे; तसेच या सर्व कामाचे स्काडा सिस्टिम पद्धतीने रेकॉर्डिंग करण्यात यावे, असे या निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम योग्य दर्जाने होत आहे का, तसेच योग्य प्रमाणात दर्जेदार साहित्य वापरले जाते का, याची माहिती या पध्दतीमुळे तत्काळ संबंधित तंत्रज्ञान व जलसंपदा अधिकार्‍यांना  समजणार होती.

गेल्या वर्षी 2017 मध्ये धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दर्जेदार साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वयंचलित मशिनच्या सहाय्याने वापरून गळती बंद करण्याबरोबर धरणाच्या भिंतीला मजबुती यावी यासाठी तत्कालीन अधीक्षक अभियंता हणुमंत धुमाळ यांनी आपले कसब पणाला लावले होते. योग्य दर्जाच्या कामासाठी लक्ष घालणारे धुमाळ यांचीच उचलबांगडी करून काम सुरू आहे; त्यामुळे गळती बंद करण्याचे काम योग्य दर्जाचे होते का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  निकृष्ट दर्जाचे टेमघर धरण सुरुवातीपासून अनेक वादांमध्ये अडकले होते. आता दुरुस्तीच्या दर्जात अडकले आहे.  कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अद्याप पूर्ण क्षमतेने धरणात पाणीसाठा झाला नाही. 

धरणाच्या भिंतीत मोठमोठी भगदाडे आहेत. अनेक ठिकाणी सिमेंट नाही. मोठमोठे दगड व वाळू आहे. त्यामुळे धरणातून सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. निकृष्ट दर्जाच्या टेमघरची चर्चा देशभर सुरू आहे; त्यामुळे दुरुस्तीचे काम योग्य दर्जाचे व्हावे यासाठी निविदेमध्ये विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसे स्पष्टपणे नमूद करूनच दुरुस्तीच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे;  मात्र त्याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.