Fri, Apr 26, 2019 10:14होमपेज › Pune › समाविष्ट पोलिस ठाण्यांना वाहनांची प्रतीक्षा

समाविष्ट पोलिस ठाण्यांना वाहनांची प्रतीक्षा

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 10:13PMदेहूरोड : वार्ताहर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात ग्रामीणमधील देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, आणि चाकण ही चार पोलिस ठाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनी आयुक्‍तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. त्यामुळे या चार पोलिस ठाण्यांचे कामकाजही आयुक्‍तालयांतर्गत सुरू झाले; परंतु पाच दिवसांनंतरही या पोलिस ठाण्यांना ग्रामीणची वाहने वापरावी लागत आहेत. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, आणि चाकण या पोलिस ठाण्यांचे कामकाज नव्या आयुक्तालयांतर्गत सुरू झाले. पोलिस ठाण्यातील संदेश आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला जाऊ लागले. पण इतर सुविधा आणि मनुष्यबळाबाबत अजूनही या पोलिस ठाण्यांची घडी बसली नसल्याचे चित्र आहे. पोलिसांना पूर्वीप्रमाणेच ग्रामीणचीच वाहने वापरावी लागत आहेत. ग्रामीणकडून देण्यात आलेली अतिरिक्त वाहने, बीट मार्शलची वाहने काढून घेण्यात आली आहेत. आयुक्तालयाकडून पोलिसांना नव्या वाहनांची प्रतीक्षा आहे. 

देहूरोड पोलिस ठाण्याकडे पूर्वी सरकारी जीपसह एक सुमो, चार दुचाकी व दंगा काबू पथकाची मिनी बस असा अतिरिक्त ताफा होता. ही सर्व वाहने ग्रामीण मुख्यालयात जमा करण्यात आली आहेत. जीपगाडी पूर्वीचीच वापरण्यात येत आहे. या शिवाय पोलिस ठाण्यातील अन्य आवश्यक साहित्यही ग्रामीणचेच वापरण्यात येत आहे. ग्रामीणकडून मिळालेल्या शस्त्रसाठ्यावरच सध्यातरी या पोलिस ठाण्याची भिस्त आहे. कामकाजाची पद्धत पूर्वीपेक्षा वेगळी असल्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना आता बदलीचे वेध लागले आहेत. ग्रामीणच बरे म्हणत अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांनी बदली मागितली आहे. त्यातून काहींची मागणी मान्यही झाली 
असल्याचे समजते.

आयुक्तालयाकडून वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र, या पोलिस ठाण्यांना भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे. देहूरोड विभाग आणि वाकड विभाग परिमंडल दोनला जोडण्यात आले आहेत. परिमंडल दोनसाठी उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून, देहूरोड विभागासाठी सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे श्रीधर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. 

लवकरच पूर्ण क्षमतेने समाविष्ट पोलिस ठाण्यांचे कामकाज सुरू होईल, अशी माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात येत आहे. परिमंडल दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी नुकतीच देहूरोड पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिस ठाण्याची हद्द, त्यातील महत्त्वाची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणे, भौगोलिक रचना आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी बोलताना लवकरच कामकाज सुरळीत सुरू होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.