Thu, Jun 20, 2019 21:09होमपेज › Pune › महापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा कायम

महापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा कायम

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:22AM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

महापालिकेत भाजपची सत्ता येऊन  दहा महिन्यांचा कार्यकाल होत आला, तरी अद्याप ‘पारदर्शक’ व ‘शिस्तबद्ध’ कारभाराच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांचे जवळचे असलेले आयुक्त महापालिकेस लाभले; मात्र त्यांच्याकडून जुन्याच नियमांना उजळणी देण्याची कार्यतत्परता दिसत असल्याने ‘स्मार्ट सिटी’चा कारभार खरेच पारदर्शक आणि गतिमान होईल का, असा सवाल केला जात आहे. 

ठाण मांडून बसलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ता घेत भाजपने पालिकेवर फेबु्रवारीच्या निवडणुकीत झेंडा फडकाविला. पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भयमुक्त कारभाराचे वचन दिलेल्या भाजपच्या कारभार्‍यांकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. आतापर्यंतचे  सुमारे दहा महिन्यांचे कामकाज पाहता, भाजपकडून ठोस असे काम अद्याप नागरिकांना दिसून आलेले नाही. अद्याप मागील सत्ताधार्‍यांच्या काळातीलच कामे सुरू आहेत. सत्ताधार्‍यांमधील गटातटांचे राजकारण दिवसेंदिवस उघडे पडत आहे. पवनाथडी रद्दची, तर दुसरीकडे कमी खर्चात आयोजनाचा निर्धार भाजपच्या वेगवेगळ्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. 

पालिका कारभारातील भ्रष्टाचाराची कीड कायम असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वारंवारच्या कारवाईतून दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहायकाला 12 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. गेल्याच आठवड्यात लेखा विभागातील क्लार्कला अटक केली. वर्षभरात एकूण सात कारवाईंत 8 अधिकार्‍यांना अटक झाली आहे. यावरून प्रशासनात ‘खाबूगिरी’ किती बोकाळली आहे, हे स्पष्ट होते. 

खर्चाला आळा घालण्याचा पुकारा भाजपने केला होता; मात्र महापौराचा स्पेन, आयुक्तांचा स्वीडन, दोन अधिकारी फिलिपाईन्स, महिला व बाल कल्याण समितीचा सिंगापूर आणि नगरसेवक व अधिकार्‍यांचा अहमदाबाद अशा असंख्य दौर्‍यांची यादीच तयार झाली. प्रत्येक दौर्‍याचा अहवाल सभागृहात मांडणार, असे भाजपने छातीठोकपणे सांगितले होते. अद्याप अहवाल सभागृहासमोर आलेला नाही. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचे प्रकरण गाजले होते. सदर प्रकरणात एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे कारण देत आयुक्तांनी ठपका असलेल्या दोन अधिकार्‍यांना दोषमुक्त केले आहे. 

आयुक्तांकडून मोठ्या अपेक्षा

मुख्यमंत्र्यांचे ‘नागपूर कनेक्शन’ असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर एप्रिलमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाले. गतिमान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा त्यांनी दिला. महापालिकेच्या जुने नियमांची सक्ती केली; मात्र थोडे दिवस त्यावर अंमलबजावणी झाल्यानंतर पहिले पाढे पंचावन्न अशी तर्‍हा सुरू आहे. आयुक्तांकडून शहराला गतिमान कामकाजाची अपेक्षा होती; मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवरून ते दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.