Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Pune › शहर स्वच्छ सर्वेक्षण निकालाची प्रतीक्षा

शहर स्वच्छ सर्वेक्षण निकालाची प्रतीक्षा

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:48AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहराचे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या महिन्यात पाहणी करण्यात आली आहे. त्याचा निकाल मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी देशात नवव्या स्थानी असलेल्या शहराचे स्थान गेल्या वर्षी 72 व्या स्थानी फेकले गेले होते. यंदा हा क्रमांक सुधारतो की, शहर आणखी मागे पडते, याकडे महापालिका पदाधिकारी, प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. यंदा समाधानकारक स्थान मिळेल, अशी अधिकार्‍यांची अपेक्षा आहे. 

केंद्राच्या समितीच्या वतीने फेबु्रवारी महिन्यात शहराचे सर्वेक्षण केले गेले. पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन, प्रत्यक्ष कामकाज, पर्यावरणपूरक यंत्रणा, नागरिकांचा सहभाग व प्रतिसाद, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय, हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न आदी विविध सोई-सुविधांची पाहणी केली गेली. त्याचबरोबर, शहरातील काही झोपडपट्टया, बाजारपेठ, सार्वजनिक शौचालय, मोशी कचरा डेपो आदींचीही त्यांनी प्रत्यक्ष भेट देण्यात आली.  त्याप्रमाणे गुणांकन करण्यात आले आहे. 

यंदा स्पर्धेत महापालिका, नगरपरिषद आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड असा छोट्या-छोट्या शहराचाही समावेश केला गेला होता. तब्बल 4 हजार 140 शहरे स्पर्धेत होती. पिंपरी-चिंचवड शहराचा 10 लाखांवरील लोकसंख्येत समावेश आहे. शहरे वाढल्याने स्पर्धा खूपच तीव्र होती. 

पहिल्या वर्षी 10 लाख लोकसंख्येवरील केवळ 73 शहरासाठी स्पर्धा घेण्यात आली. त्यात पिंपरी-चिंचवड शहराने नववे स्थान पटकावून शहराच्या नावलौकीकात भर घातली. शहराचे राज्यभरात कौतुक झाले. शहराला स्वच्छतेबाबत 2 हजारपैकी 1 हजार 559 गुण मिळाले होते. मात्र, दुसर्‍याच वर्षी म्हणजे 2017 ला हे स्थान घसरून 72 वे फेकले गेले. त्यामध्ये अमृता अभियानातील देशातून 434 शहरांचा समावेश होता. त्यात एकूण 2 हजार गुणांपैकी शहराला 1 हजार 320.18 गुण प्राप्त झाले. तर, पुणे शहराला 1 हजार 660.19 गुणांसह 13 व्या स्थानी पोहचला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाला मोठ्या टीकेस सामोरे जावे लागले. 

यंदाच्या वर्षी पालिकेने स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक ठोस पावले उचलली गेली. शहरात ठिकठिकाणी पालिका व स्वयंसेवी संस्थांच्या सहभाग घेऊन स्वच्छता अभियान राबविले. तसेच, वैयक्तिक शौचालयाचे टार्गेट पूर्ण करून शहर हागणदारीमुक्त केले. केंद्राचे स्वच्छता मोबाईल अ‍ॅपचा वापरातही पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले. सार्वजनिक शौचालयामधील रंगरंगोटी व स्वच्छतेवर भर दिला. घनकचरा संकलनाचे प्रत्यक्ष कामांत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. शहर स्वच्छतेने नटलेले असताना केंद्रीय पथकाने शहरात तब्बल 5 दिवस पाहणी केली. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. तर, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची नोंदीही तपासल्या.

स्पर्धेचा निकाल मार्च किंवा एप्रिल महिन्यात अपेक्षित आहे. त्यात शहरास कितवा क्रमांक मिळतो, याकडे पालिका पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. स्वयंसेवी संस्था व नागरिकांमध्येही त्याची उत्सुकता आहे. देशात पहिल्या 25 मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे शहरात स्वच्छ अभियान अधिक जोमाने राबविण्यास प्रोत्साहन आणि चालना मिळणार आहे.

शहर स्वच्छतेस प्राधान्य

स्वच्छ शहर ठेवण्याची महापालिकेची जबाबदारी आहेत. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणात काळात म्हणजे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात त्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. आता निकालाची वाट पाहत आहोत. प्रशासनाने आपल्या परिने शहर स्वच्छतेबाबत सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. त्या नियमितपणे सुरूही आहेत,असे पालिकेचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.