Sun, May 26, 2019 21:04होमपेज › Pune › वाघोली झाले वाहतूक कोंडीचे ‘हब’

वाघोली झाले वाहतूक कोंडीचे ‘हब’

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:57AMवाघोली : वार्ताहर 

वाघोली परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी येथील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. यामुळे वाघोली हे वाहतूक कोंडीचे हब बनू लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाघोलीतील वाहतूक कोंडीसंदर्भात वाघोली ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असताना अतिक्रमण काढण्यासाठी महसूल, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीच्या साहाय्याने संयुक्त कारवाई करावी, असे पत्र वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसह अतिक्रमण करणारांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने व्यक्‍त होत आहे. 

वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वाघोलीतून जाणारा पुणे - नगर महामार्ग पुणे शहराला नगर, औरंगाबाद, शिर्डी, विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने या महामार्गावर  वाघोली येथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. ग्रामपंचायतीकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच नगर रस्त्यावर केसनंद फाटा, आव्हाळवाडी फाटा व वाघेश्वर चौक या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल व सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. 

वाघोली येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार वाघोली गावामध्ये पुणे-नगर रस्त्यालगत नो पार्किंग व नो-हॉकर्स झोनसाठीची जागा ग्रामसभेद्वारे निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पाठविलेला आहे. त्याचप्रमाणे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार वाहतूक तज्ज्ञ प्रतापसिंह भोसले यांचेकडून वाहतूक कोंडीचा तांत्रिक सर्व्हे करून त्याबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल लोणीकंद पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना चित्रफितीसह देण्यात आलेला आहे. परंतु, आजतागायत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. असे असतानाही वाघोली येथील वाहतूक कोंडीसाठी वारंवार ग्रामपंचायतीला वेठीस धरले जात आहे.

कार्यवाही करण्याची गरज...

महामार्गावर दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. सदर अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्ये झालेले आहे. रस्त्याच्या कडेची अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायत वाघोली तयार आहे. परंतु, यासाठी महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोणीकंद पोलिस स्टेशन व ग्रामपंचायत यांची संयुक्त कारवाई होणे आवश्यक आहे. तरी संपूर्ण राज्याला परिचित असणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास वाहतूक कोंडी निश्चित कमी होईल. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत संबंधित विभागांना आदेश देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.