Thu, Apr 25, 2019 23:51होमपेज › Pune › वाघोली बनले गुटख्याचे महाकेंद्र 

वाघोली बनले गुटख्याचे महाकेंद्र 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 10:15PMवाघोली : वार्ताहर

पूर्व हवेलीतील जास्त लोकसंख्या असलेले एकमेव असणारे वाघोली गाव आता जिल्ह्यात सर्वात जास्त गुटखा विक्रीचे केंद्र म्हणून नावारूपास येऊ लागले आहे. त्याचबरोबर अवैध धंदेही फोफावले आहेत. मात्र संबधित विभागाकडून या धंद्यांना अभय असल्यामुळे अनेक संसाराची राखरांगोळी होत असून वाघोली व परिसरात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे.

पूर्व हवेलीतील वाघोली, अष्टापुर, हिंगणगाव, आव्हाळवाडी, केसनंद, मांजरी, बकोरी आदि गावांमध्ये पान टपर्‍यांवरून व किराणा दुकानांमधून बिनधास्तपणे गुटखा विक्री होत आहे. गुटखा विक्रीवर बंदी असतांना देखील संबधित अधिकार्‍यांच्या हप्तेखोरीमुळे अवैध धंद्यात प्रचंड वाढ झाल्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली आहे. अनेक ठिकाणी मटका, जुगार, अवैध वाहतूक, गांज्या विक्री, गुटखा विक्री, बेकायदा दारू विक्री, हातभट्टीची दारू आदि प्रकाराने थैमान घातले असून असंख्य महिलांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे वास्तव आहे. शाळा, महाविद्यालय परिसरातील टपर्‍यांवर गुटखा विक्री होतांना दिसून येते. त्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर गुटख्याच्या आहारी जात असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे.

वाघोलीसह अष्टापूर, हिंगणगाव आदि ठिकाणी मटका, जुगार, दारू अड्डे, गुटका

विक्री याबाबीने तर कहर केला आहे. मटका, जुगाराच्या आहारी मोठ्या माणसाबरोबर लहान मुले सुद्धा गेली आहेत. दुचाकी, तीन चाकी व चारचाकी आदि वाहनांमधून गुटखा विक्रीची बिनधास्तपणे वाहतूक केली जाते. एवढेच नव्हे तर गुटख्याचे मुख्यकेंद्र वाघोली असल्यामुळे याठीकाणाहून शहरात देखील गुटखा पुरवठा करण्याचे काम मोठ्याप्रमाणात वाघोलीमधून केले जाते त्यामुळे वाघोली गाव गुटख्याचे केंद्र म्हणून जिल्ह्यात ओळखले जाऊ लागले आहे.

वसुलीसाठी स्वतंत्र कर्मचारी 

गुटखा विक्रीवर कारवाई करण्यासाठी अन्न औषधी विभाग असतांना मात्र कारवाईची बडगा दाखवत वाघोलीसह लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या 25 गावातील पान टपर्‍या, दुकाने, विक्रीसाठी गुटखा भरून येणारी वाहने यांच्याकडून हप्ता वसुलीसाठी स्वतंत्र पोलीस कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. मटका, जुगार, भंगार, हॉटेलवर बेकायदा दारू विक्री, लॉजवर चालणारे अवैद्य धंदे यासाठी वेगवेगळ्या स्वतंत्र कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे.

पोलीसही करतात व्याजाचा धंदा 

वाढत्या अवैध धंद्यामुळे अनेक तरुण जास्त पैसा कमावण्याच्या मोहापाई सावकाराकडून व्याजाने पैसे आणून आकडा लावणे, जुगार खेळणे या प्रकारामध्ये अडकलेला दिसून येतो. याचाच फायदा घेत पोलीस विभागामध्येही खाजगी सावकार तयार झालेले दिसून येत आहे. नुकतेच वाघोलीत एका युवकाने व त्याच्या पत्नीने पोलिसांकडून व्याजाने आणलेल्या पैशाचा तगादा लावल्यामुळे विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. अवैध धंद्यातून मिळणार्‍या पैशाची अजून वाढ करण्याच्या हव्यासापोटी काही पोलिसांनी बेकायदेशीर खासगी सावकारी सुरु केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.