Sat, Apr 20, 2019 23:52होमपेज › Pune › थर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई

थर्टीफर्स्ट पार्टी’च्या तरुण-तरुणींवर वन खात्याची कारवाई

Published On: Jan 02 2018 1:51AM | Last Updated: Jan 02 2018 1:08AM

बुकमार्क करा
वडगाव मावळ : वार्ताहर 

ठाकूरसाई (मावळ) येथे वन खात्याच्या जागेमध्ये अवैधरीत्या प्रवेश करून थर्टीफर्स्ट पार्टीचे ऑनलाईन आयोजन करणार्‍या दोन आयोजकांसह सुमारे 27 तरुण-तरुणींवर मावळ वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. वन खात्याकडून तालुक्यात पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर वन विभागाचे तालुका वनक्षेत्रपाल एस. झेड. ताकवले, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मारणे, वन परिमंडल अधिकारी एम. व्ही. सपकाळे, व्ही. बी. निकम आदींनी विविध पथके तयार करून वन खात्याच्या हद्दीत येणार्‍या राजमाची, तिकोणा, लोहगड, तुंग आदी ठिकाणी गस्त चालू ठेवली होती.

दरम्यान, पवना धरणालगत असणार्‍या ठाकूरसाई येथे वन खात्याच्या हद्दीमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुमारे 25 तंबू ठोकून त्या ठिकाणी थर्टीफर्स्ट पार्टी सुरू असल्याचे वन कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार वन खात्याच्या अधिकार्‍यांनी पार्टीच्या आयोजकांसह तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. पार्टीचे आयोजक नीलेश ठाकर व निखिल ठाकर (दोघेही रा. ठाकूरसाई) यांच्यासह सर्व तरुण-तरुणींवर पार्टीच्या उद्देशाने वन खात्याच्या जागेत अवैध प्रवेश करून तंबू ठोकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण-तरुणी उच्चशिक्षित असून, प्रामुख्याने मुंबई येथील रहिवासी आहेत. या परिसरामध्ये अनेक स्थानिक लोक आपल्या खासगी जागेमध्ये ऑनलाईन बुकिंग घेऊन हा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत; परंतु, ठाकर यांनी वन खात्याच्या जागेमध्ये अवैध प्रवेश करून सनशाईन पवना कॅम्प नावाने ऑनलाईन बुकिंगद्वारे हा व्यवसाय केला असून, प्रत्येकी 1500 रुपयेप्रमाणे हे बुकिंग केल्याचे समजते.