Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Pune › गौराई माझी लाडाची लाडाची गं!

गौराई माझी लाडाची लाडाची गं!

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

गणपतीबरोबर सर्वत्र गौरी आगमनाचेही वेध लागले आहेत. गौरींसमोरील सजावटीसह त्यांच्यासाठीच्या दागिने आणि साड्यांमध्येही यावर्षी वैविध्य पहायला मिळत आहे. गणपती एव्हढीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त तयारी महिला गौरी पूजनाची करतात. त्यासाठी तुळशीबागेसह इतर बाजारपेठा महिलांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. यावर्षी गौरींच्या मुखवटे आणि स्टँडमध्येही विविध प्रकार उपलब्ध आहेत ते घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे. 

गौरींच्या व त्यांच्या बाळांच्या मुखवट्यांपासून, त्यांचे स्टँड, हात, दागिने विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. सर्वात जास्त वैविध्य आहे ते दागिन्यांमध्ये. माहेरवाशीण म्हणून दोन दिवस पाहुणचारासाठी येणार्‍या गौराईसाठी घराघरांत विशेष खरेदी केली जाते. दागिन्यांबरोबरच साड्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. यंदा बाजारात काय विशेष वस्तू आल्या आहेत त्याची वाचकांसाठी ही माहिती.

1) गौरी आणि बाळांचे मुखवटे : शाडू, पितळी किंवा प्लास्टर अ‍ॅाफ पॅरिसच्या मटेरियलमध्ये उपलब्ध असणारे मुखवटे अत्यंत सुंदर आणि जिवंत वाटणारे आहे. रेखीव काम हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सोनेरी रंगामध्ये मुखवट्यांवर रंगवलेल्या दागिन्यांमुळे हे मुखवटे जास्त आकर्षक दिसत आहेत. झोपाळ्यावर बसलेल्या मूर्तीसारख्या गौरी हेही यावर्षीचे एक आकर्षण आहे. 

2) स्टँड : गौरी आणि बाळांना उभारण्यासाठी विविध प्रकारचे स्टँड उपलब्ध आहेत. लोखंडी घडणावळीचे, पत्र्याला स्टँडचा आकार देऊन अशा विविध प्रकारांत रेडिमेड स्टँड आहेत, ज्यावर गौरी उभारण्यासाठी अत्यंत सोप्या आहेत. 

3) दागिने : गौरी सजावटीतील अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो तो दागिन्यांचा. दरवर्षी एखादा तरी दागिना नवीन घेतला जातो. यावर्षीही अनेक नवीन प्रकार आले आहेत. सोन्याचे वाटतील अशा धातूमध्ये विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. यावर्षी  इमिटेशन ज्वेलरीला जास्त डिमांड आहे. सुंदर आणि खरे वाटत असल्यामुळे महिला त्यांना जास्त पसंती देत आहेत. मोहनमाळ, राणी हार, पेशवे हार असे अनेक प्रकार त्यात आहेत. मोती आणि त्यावर जडवलेले कुंदन या दागिन्यांनाही जास्त मागणी आहे. दोन्ही प्रकारच्या दागिन्यांमध्ये फक्त हारच नाही तर कमरपट्टा, बांगड्या, मुकुट, नथ, पैंजण असे दागिने आहेत. याशिवाय सजावटीच्या सामानाचेही अनेक प्रकार उपलब्ध आहेत. 

4) पडदे : गौरींच्या मागे सजावटीसाठी पडदे लावले जातात. त्या पडद्यांमध्येही बरेच प्रकार पहायला मिळतात. मणी, क्रिस्टल लावलेले पडदे. रेग्युलर पडदे यांशिवाय सॅटिन कापडांच्या झालरींपासून बनवलेले पडदेही खुपच सुंदर आहेत. 

5) डेकोरेशनचे साहित्य : काचेचे, कागदी, विविधरंगी फुलांचे गुच्छ, लाईटवर चालणारे कारंजे, लाईटच्या माळा अशा अनेक गोष्टी सजावटीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. फुलांच्या माळांमध्ये यावर्षी अनेकविध प्रकार आले आहेत. गौरी पुढील आरास करण्यासाठी त्यांच्या चांगला उपयोग होणार आहे.