Wed, Jul 17, 2019 08:17होमपेज › Pune › चाकण, राजगुरूनगरमध्ये बंदला हिंसक वळण

चाकण, राजगुरूनगरमध्ये बंदला हिंसक वळण

Published On: Jul 30 2018 7:57PM | Last Updated: Jul 30 2018 8:00PMचाकण / राजगुरुनगर : प्रतिनिधी

मराठा समाज आरक्षण मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला खेड तालुक्यातील चाकण आणि राजगुरुनगर येथे सोमवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बसगाड्या, पोलिसांची वाहने, पोलिसांचे निवारा केंद्र यांना आगी लावल्या; तर वाहनांवर इतरत्र केलेल्या तुफान दगडफेकीमुळे पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्यासह अनेक जण जखमी झाले. हिंसाचार रोखण्यासाठी अखेर चाकणमध्ये पोलिसांनी जमावबंदी लागू केली. तळेगाव चौकात पोलिसांनी हवेत गोळीबार केला. सध्या अतिरिक्त बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

चाकणमध्ये आंदोलकांनी 10 ते 15 बसगाड्या पेटविल्या; तसेच 8 ते 10 खासगी वाहने जाळून टाकण्यात आली. यामध्ये पोलिसांची वाहनेसुद्धा होती. याच ठिकाणी पोलिस चौकीसुद्धा जाळण्यात आली. चाकण पोलिस ठाण्याच्या समोर असलेली वाहनेही संतप्त जमावाने पेटवून दिली. आंदोलकांनी केलेल्या तुफानी दगडफेकीत पोलिस, पत्रकार, नागरिक यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. आरसीपीच्या सशस्त्र तुकड्या आणि पोलिस बळाचा वापर करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी चाकण नगरपालिकेची, अग्निशामक दलाची गाडीही फेटवून दिली. 

चाकण येथे सुमारे 6 ते 7 तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. चाकणला रास्ता रोकोनंतर शांततेत समाजातील नेत्यांची भाषणे संपल्यानंतर संतप्त युवकांनी आंदोलन आपल्या ताब्यात घेतल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. या आंदोलकांनी राज्यकर्त्यांना शिव्यांची लाखोली वाहत वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे पोलिसांसह सर्वच जण अचंबित झाले. भानावर आल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

राजगुरुनगर येथेही संतप्त युवकांनी  बसगाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. या ठिकाणीही पुणे-नाशिक महामार्ग सुमारे 6 तास अडवून धरण्यात आला होता. सायंकाळी साडेपाचनंतर आंदोलन संपेल असे वाटत असतानाच सुमारे 1 हजार युवकांच्या जमावाने पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

जमावाने सकाळी दगडफेक करून बंद पाडलेली बस संध्याकाळी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली; परंतु याचा उलटा परिणाम झाला. पोलिसांची संख्या कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर जमाव या पोलिसांवरच चालून गेला. त्यामुळे पोलिसांना तेथून पळून जावे लागले. मग संतप्त जमावाने दिसेल ते वाहन फोडण्यास सुरुवात केली. तसेच हा जमाव पुढे पोलिस ठाण्याकडे गेला. सुदैवान यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.