Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Pune › बेशिस्तीतही पुणेकरांना नाही तोड!

बेशिस्तीतही पुणेकरांना नाही तोड!

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:20AMपुणे : अक्षय फाटक

वाहतूक नियम मोडणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशाच काहीशा आविर्भावात सध्या काही पुणेकर वावरत आहेत. कारण तीनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियम मोडणार्‍या पुणेकरांची संख्या तब्बल 51 हजार, तर पाचपेक्षा जास्त वेळा नियम मोडणार्‍यांची संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. या नियमांच्या उल्लंघनामुळे झालेल्या कारवाईत पोलिसांनी पाच महिन्यांत तब्बल 16 कोटी 17 लाख 87 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.

एरवी नियमांवर बोट ठेवून वागणार्‍या पुणेकरांचा वाहन चालवतानाचा बेशीस्तपणा हळूहळू वाढत असल्याचेच या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे अपघातमुक्त आणि सुरक्षित प्रवास होण्यासाठी पुणेकरांना वाहतूक नियमांबाबत सजग होण्याची गरज आहे. 

शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वाहन संख्येच्या विस्फोटामुळे आधीच पुणेकर सततच्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. त्यात काही बेशिस्त वाहनचालकांची त्यात भर पडू लागली आहे. नियम धाब्यावर बसवून काही वाहन चालक गाड्या दामटवताना दिसत आहेत. त्यामुळे जागोजागी अपघात होऊन, वाहन कोंडी होत आहे. अचानक वीज प्रवाह खंडित झाल्यास किंवा काही तांत्रिक कारणाने सिग्नल बंद पडल्यास ते बेशिस्त वाहनचालकांच्या पथ्यावर पडते. हॉर्न वाजवून, गाड्या रेस करून, सुसाट वाहन दामटवणार्‍या चालकांमुळे काही मिनिटांमध्ये अशा सिग्नल बंद पडलेल्या प्रमुख चौक व रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते. 

वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही बेशिस्त वाहनचालक दंड भरतात आणि पुन्हा नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. प्रत्यक्ष आणि सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार शहरात काही वाहन चालक वारंवार नियम मोडत असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा काही चूक नसतानाही या सुसाट वाहनचालकांमुळे पादचारी व नियम पाळणार्‍या वाहन चालकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणेही आहेत. या बेशिस्त वाहनचालकांवर आता आणखी कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

गेल्या वर्षात 32 कोटी 24 लाखांचा दंड

पुणे पोलिसांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ पाच महिन्यांत निम्मा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षात 32 कोटी 24 लाख 50 हजार 328 रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी ई-चलनद्वारे 21 कोटी 34 लाख 40 हजार 128 रुपयांचा दंड केला होता. त्यातील 13 कोटी 93 लाख 70 हजार 509 रुपये दंड पोलिसांकडे जमा झाला, तर, 7 कोटी 40 लाख 69 हजार 619 रुपयांचा दंड पुणेकरांकडून वसूल करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सापडलेल्या नियम तोडणार्‍या वाहनचालकांना 10 कोटी 90 लाख 10 हजार 200 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यातील 2 कोटी 53 लाख 92 हजार रुपयांचा दंड वाहनचालकांनी भरला, तर 8 कोटी 36 लाख 18 हजारांचा दंड वसूल करण्यात येत आहे.  

आकडे बोलतात

पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून केवळ पाच महिन्यांत सीसीटीव्ही व ई-चलनद्वारे अशा बेशिस्त वाहनचालकांना तब्बल 16 कोटी 17 लाख 87 हजार रुपयांचा दंड केला आहे. यामध्ये ई-चलनद्वारे 11 कोटी 89 लाख 76 हजार 821 हजार दंडाचा समावेश आहे. त्यातील 8 कोटी 20 लाख 67 हजार 503 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर 3 कोटी 69 लाख 9 हजार 318 रुपयांच्या दंडाची वसुली सुरू आहे.  तसेच, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सापडलेल्या नियम तोडणार्‍या वाहन चालकांना पोलिसांनी 4 कोटी 28 लाख 10 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यातील केवळ 46 लाख 62 हजार 700 रुपये दंडाची वसुली झाली आहे. यातील 3 कोटी 81 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड अद्याप वाहनचालकांनी भरलेला नाही.