Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Pune › वाहनचालकांकडून नियमांचे उल्‍लंघन

वाहनचालकांकडून नियमांचे उल्‍लंघन

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:22PM
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करत आहेत. वन-वे असतानाही वाहनचालक उलट्या बाजूने प्रवास करत आहेत. सकाळच्या वेळेला वाहतूक शाखेचे पोलिस कारवाई करतात; मात्र दुपारी पोलिस नसताना वाहनचालक सर्रास येथून जातात.पिंपरी येथील भाजी मंडईवरील इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून मोरवाडी चौक, पिंपरी गाव, भाटनगर आदी परिसराकडे जाता येते. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था नाही. त्यामुळे तीनही ठिकाणांहुन वाहने येत असताना वाहतुकीचा फज्जा उडतो. अनेकदा या परिसरात किरकोळ अपघाताचे प्रकार घडतात. 

अनेक वाहनचालक त्वरीत पिंपरी गावात किंवा भाटनगरकडे जाण्यासाठी उलट्या मार्गाने प्रवास करतात.  त्यामुळे या परिसरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. मोरवाडी चौकातून येणारे वाहनचालक तसेच सरळ उड्डाणपुलावर उलट्या बाजूने वाहने चालवित असतात. तर पिंपरी चौकात जाण्यासाठी मोरवाडीतून अथवा उड्डाणपुलाजवळून वळसा घालून जावे लागत आहे. हा व्याप टाळण्यासाठी वाहनचालक उलट्या बाजूने वाहन चालवित पिंपरी चौकाकडे मार्गस्थ होत असतात. त्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबत संबंधित पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

पोेलिसांचा हवा धाक

वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सकाळच्या दरम्यान वाहनधारकांवर कारवाई करतात. दुपारी या ठिकाणी कोणीच नसल्याने वाहनधारकांनाही त्यांची वेळ माहिती झाली आहे. त्यामुळे ते कोणालाच न भिता नियम धाब्यावर बसवित उलट्या दिशेने वाहने चालवतात. 

वाहतूक कोंडीची समस्या

शगुन चौकातून इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून वाहनधारक जात असतात; मात्र मोठा वळसा टाळण्यासाठी ते वन-वेतून आपले वाहन चालवित असतात. त्यामुळे गोकुळ हॉटेल  समोरील उड्डाणपुलाच्या सुरूवातीला वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजुने येणार्‍या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.