Mon, Aug 19, 2019 06:02होमपेज › Pune › लांडे यांनी सोडले भाजपविरोधातील मौन

लांडे यांनी सोडले भाजपविरोधातील मौन

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 25 2018 10:20PMपिंपरी : संजय शिंदे 

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस ‘हल्ला बोल’ आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडमध्येही विविध प्रश्‍नांवरून राष्ट्रवादीने भाजपला कोंडीत पकडणे सुरू केले आहे;  परंतु पिंपरी-चिंचवडचे दुसरे शरद पवार असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते विलास लांडे राज्य सरकार व पालिकेतील सत्ताधार्‍यांच्या विरोधात मौन धारण करून होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मरगळ होती; मात्र आता शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नाने उग्र रूप धारण केल्यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेला भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माजी आ. विलास लांडे यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विलास लांडे आणि भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांची मैत्री सर्वश्रृत आहे; परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकारण बदलले. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जगताप यांनी राजकीय वातावरणाची नस ओळखून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, विलास लांडेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असताना त्यांनी सर्व अंदाज चुकवून राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रति निष्ठा व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.

त्यानंतर खा. शरद पवार आणि लांडे यांच्यामध्ये गुप्तगू झाल्यानंतर पालिका निवडणुकीसाठी लांडे पुन्हा सक्रिय झाले; मात्र मोदी इफेक्ट आणि आ. लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, खा. अमर साबळे आणि आझम पानसरे यांनी एक मोट बांधल्यामुळे भाजपचे 77 नगरसेवक निवडून आणण्यात ते यशस्वी झाले.

त्यानंतर पारदर्शकतेचा नारा देणार्‍या भाजपने विविध कामांत मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आवाज शिवसेनेने उठविला. शहर राष्ट्रवादी काँग्रसने मोठ्या नेत्यांशिवाय  भाजपला कोंडीत पकडण्यात सुरुवात केली.  शहराचे राजकारण कोळून प्यायलेले विलास लांडे यांच्यासारखा खंदा समर्थक राष्ट्रवादीकडे असताना ते भाजपबाबत गप्प का, असा सवाल अनेक वेळा उपस्थित होत होता. 
जोपर्यंत लांडे आक्रमक होणार नाहीत तोपर्यंत भाजपला कोंडीत पकडता येणार नाही, असा मतप्रवाह पुढे येत असतानाच लांडे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावरून आपली आक्रमक भूमिका मांडली. 

त्यामुळे भाजपबाबत नेहमीच मौन राखणारे लांडे यांनी भाजपबाबत आक्रमक भूमिका घेणे हेही नसे थोडके ही भूमिका भोसरी विधानसभा मतदारसंघाबरोबरच शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे.