Fri, Aug 23, 2019 21:38होमपेज › Pune › विठ्ठलवाडी-देहू ३० मीटर रुंद रस्ता ताब्यात दिल्यास विकास

विठ्ठलवाडी-देहू ३० मीटर रुंद रस्ता ताब्यात दिल्यास विकास

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विठ्ठलवाडी ते देहू गाव रस्ता केवळ 7.50 मीटर रुंद आहे. हा रस्ता 30 मीटर रुंद विकसित करण्यासाठी भूसंपादन करून ती जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशा सूचना पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व देहू ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. 

या संदर्भात पालिकेच्या मधुकरराव पवळे सभागृहात सोमवारी (दि. 27) बैठक झाली. या वेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विविध विषय समिती सभापती, नगरसेवक, अधिकारी, तसेच पीडब्ल्यूडीचे उपअभियंता टिळक, देहू ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा चव्हाण व सदस्य उपस्थित होते. 

विठ्ठलवाडी ते देहूगाव कमानीपर्यंतचा सुमारे दीड किलोमीटर अंतराचा रस्ता गेली 6 वर्षे पालिका दुरुस्त करीत आहे. त्यावर प्रत्येक वर्षी तब्बल 60 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. हा रस्ता अद्यापही 7.50 मीटर रुंद आहे. या रस्त्याचे पालिकेतर्फे 30 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजूने ड्रेनेज, पावसाळी गटर, डक्ट, पदपथ, पददिवे आदी कामे केली जाणार आहेत. मात्र, गेली 6 वर्षे बाधित शेतकरी व पीडब्ल्यूडीमधील वादामुळे हा प्रश्‍न प्रलंबित आहे. 

उत्तरेकडील रस्ता गायरान क्षेत्रात असून तो रस्ता विकसित करण्यास काही हरकत नसल्याचे देहूगाव ग्रामपंचायतीचे मत आहे. तर, दक्षिण रस्तावर अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी रस्त्यास बाधित आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळाल्यास ते जागा देण्यास तयार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. जागेच्या मोबदल्यापोटी 200 कोटी रुपयांचा निधी पीडब्ल्यूडीकडे उपलब्ध आहे. पीडब्ल्यूडीने तातडीने कारवाई करीत बाधित शेतकर्‍यांना लाभ देऊन ही जागा ताब्यात घ्यावी, अशी सूचना बैठकीत पालिका अधिकार्‍यांनी केली. संपूर्ण 30 मीटर रुंदीची जागा ताब्यात न दिल्यास त्या रस्त्याचा विकास करता येणार नाही, असे स्पष्ट मत आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केले.

या संदर्भातील सूचना गेल्या वर्षीही आयुक्तांनी पीडब्ल्यूडीला दिल्या होत्या, मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. या संदर्भात महापौर जाधव यांनी सांगितले की, विठ्ठलवाडी ते देहूगाव कमानीपर्यंतचा रस्ता विकसित करण्यास पालिका तयार आहे. मात्र, पीडब्ल्यूडीने 30 मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन करून पालिकेकडे हस्तांतरित करावा. त्यानंतर पालिकेच्या वतीने सर्व सोई पुरविल्या जातील. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आ. लांडगे, मावळचे आ. बाळा भेगडे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांची लवकरच बैठक घेतली जाणार आहे.