होमपेज › Pune › नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 21 2018 10:46PMपिंपरी : प्रतिनिधी

पवना धरण परिसरात व पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पाऊस सुरू आहे. पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून दररोज पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीपात्र दुथडी  भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे.   या विषयावर पालिका अधिकार्‍यांची बैठक मंगळवारी (दि. 21) झाली. त्या अनुषंगाने पालिकेच्या सर्व संबंधित विभागांना त्यांच्याकडील यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष तसेच, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पूरनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरीकांनी या केंद्राशी संपर्क साधावा, असे अवाहन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

विजा चमकताना झाडाखाली थांबू नये. घरातील विजवाहक तारा तसेच, विद्युुत उपकरणे यांची तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. पावसात रस्त्यावरील विजवाहक तारा, विजेचे खांब, डी. पी. बॉक्स, फीडर बॉक्स, इत्यादी विद्युत वाहकाजवळ जाऊ नये. तसेच अशा ठिकाणी जनावरे जाऊ देऊ नये किंवा बांधू नये. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून, नाल्यातून आणि पुलावरून पाणी वाहत असताना जऊू नये, पुराच्या वाहत्या पाण्यात पोहू नये. 

पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तसेच, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या  ठिकाणी वास्तव्य करू नये. औद्योगिक क्षेत्रात उघडयावर रासायनिक पदार्थांचा साठा करू नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकतात. त्यामुळे त्यापासून नागरिकांनी जपून रहावे. असे आवाहन पालिकेने केले आहे. 

नागरिकांनी स्वत:हून पर्यायी ठिकाणी स्थलांतरित व्हावे

पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी  एकमेकांना सहकार्य करून प्रशासनास सहकार्य करावे. नदीकाठच्या क्षेत्रातील रहिवाशांनी सतर्क राहून स्वतःहून पर्यायी ठिकाणी अथवा संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित व्हावे. पावसाळ्यात रस्त्यावरून विशेषत:  वळणावर वाहन नियंत्रित वेगाने व सावकाश चालवावे. पावसापासून बचाव करण्यासाठी झाडे, पडक्या इमारती, भिंती, जाहिरात होर्डिंग्ज, मोबाईल टॉवर यांच्या जवळपास थांबू नये, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक

तातडीच्या मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष : 020-67331556 व 39331456, मुख्य अग्निशमन केंद्र : 101, 020-27423333, 020-27422405, 9922 501475,  ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय 9922501453, 9922501454, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय: 9922501455, 9922501456, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय : 9922501457, 9922501458, ‘ड’ क्षेत्रीय  कार्यालय : 9922501459, 9922501460, ‘ई’  क्षेत्रीय कार्यालय :  8605722777, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय : 8605422888, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय 7787868555, 7887879555, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय : 9130051666, 9130050666.