Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Pune › उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीच्या हालचालींना वेग

उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीच्या हालचालींना वेग

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:06PMवडगाव मावळ : गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपद व स्वीकृत सदस्य निवडीसाठी काही दिवस बाकी असल्याने हालचालींना वेग आला आहे. परंतु अजूनही तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशीच अवस्था कायम आहे.

नगरपंचायतच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत संख्याबळाची ‘त्रिशंकू’ अवस्था झाल्याने सत्तेचे गणित बांधताना ‘तुझं-माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ अशी गत तीनही गटांची झाली असल्याबाबत ‘पुढारी’ने दि.6 रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. नगरपंचायतमध्ये पक्षचिन्हानुसार संख्याबळ पाहिले तर भाजप 7, राष्ट्रवादी 7, मनसे 1 व अपक्ष 2 अशी स्थिती असून पॅनेलप्रमाणे पाहिले तर भाजप 5, पोटोबा महाराज नगरविकास आघाडी 6 व वडगाव कातवी नगरविकास समिती 4, मनसे 1 व अपक्ष 1 अशी त्रिशंकू अवस्था आहे. 

सत्तेसाठी मॅजिक फिगर गाठायची असेल तर चिन्हानुसार एकत्र आल्यास अपक्ष व मनसेची मदत घ्यावी लागणार आहे. अन्यथा कोणत्याही दोन गटांना एकत्र यावे लागणार आहे असे चिन्ह दिसत आहे. त्यादृष्टीने निवडणूक निकालापासून प्रयत्नही सुरु आहेत. परंतु, तीनही गटांची तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था आजतागायत कायम आहे. दि. 21 रोजी होणार्‍या विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्षपद व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असून स्वीकृत सदस्यसाठी दि.20 रोजी अर्ज दाखल करावे लागणार आहे.त्यामुळे निवडीच्या दृष्टीने हालचालींना चांगलाच वेग आला असून तीनही गटांच्या एकमेकांशी चर्चेच्या फेर्‍या सुरु असून आता अखेर सत्तेची मॅजिक फिगर गाठण्यात कोण यशस्वी होतो आणि उपनगराध्यक्षपद कोणत्या गटाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नगराध्यक्षांचे मत ठरणार निर्णायक?

दरम्यान, सत्तेचे गणित बांधताना निवडून आलेल्या मनसेच्या सायली म्हाळसकर, अपक्ष राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण यांची भूमिका महत्वाची ठरणार असून थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्षही कलम 2(7) अन्वये एक नगरसेवक असल्याने त्यांनाही उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे; तसेच समसमान मते झाल्यास पुन्हा निर्णायक मताचाही वापर करता येतो, असा उल्लेख शासन परिपत्रकामध्ये असल्याने नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे.