Tue, Apr 23, 2019 02:25होमपेज › Pune › अतिजलद बससेवा संथ गतीने

अतिजलद बससेवा संथ गतीने

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:10PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमपीएमएलने दापोडी-निगडी हा दुहेरी बीआरटी मार्गाची जनजागृती न केल्याने प्रवाशांची मोठी धांदल उडून गैरसोय होत आहे. ट्रॅफिक वॉर्डन नेमूनही बीआरटी मार्गातून खासगी वाहने बिनदास्तपणे ये-जा करीत आहेत.  त्यामुळे सर्व्हिस मार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होत आहे. मार्गावरील अडथळे पार करीत अतिजलद बससेवा संथ गतीने सुरू असल्याचे चित्र अनुभवास मिळत आहे.    

तब्बल 6 वर्षांपासून रखडलेला हा बीआरटी मार्ग अखेर शुक्रवारी (दि.24) सुरू करण्यात आला. या संदर्भात पालिका व पीएमपीएमएलने कोणतीही जनजागृती केली नव्हती. केवळ निगडीच्या बस टर्मिनसचे उद्घाटन होणार असल्याचा नागरिकांचा समज झाला होता. मात्र, अचानक हा मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांची धांदल उडत आहे. 

प्रवासी नेहमीप्रमाणे बस थांब्यावर थांबतात. मात्र, काही बसेस बीआरटी मार्गातून धावत बीआरटी थांब्यावर थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडत होती. बॅरिकेट्सवर चढून प्रवाशांना थांबा गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांची धांदल उडत आहे.  त्यामुळे  मार्गावर नेहमीच्या व बीआरटीच्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसत आहे.  

तसेच, बीआरटीचे अनेक थांब्यावरील स्वयंचलित दरवाजे काम करीत नाहीत. तेथील प्रवाशांना हातानेच दरवाजाची उघड-झाप करावी लागत आहे.  त्यामुळे थांब्यावरून पडून एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 

तसेच, बीआरटी मार्गावर ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ आणि चौकात ट्रॅफिक वॉर्डन व सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.  मात्र, त्यांचा विरोध झुगारून खासगी वाहनचालक बिनदास्तपणे बीआरटीमधून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पुढे व मागे वाहने आणि मध्ये बस असे चित्र पाहावयास मिळाले. तर, थांब्यावर बस थांबल्यानंतर मागे इतर वाहनांच्या रांगा लागत होत्या. परिणामी सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र अनुभवायास मिळत आहे. तसेच, चिंचवड एम्पायर पूल ते खराळवाडीपर्यंत आणि कासारवाडीत पुणे मेट्रोचे काम सुरू असल्याने त्याचबरोबर अनेक वर्दळीच्या रस्त्यावर बॅरिकेट्स नसल्याने बीआरटी बस सर्व्हिस लेनमधून धावत आहेत.  अनेकदा बस वाहतूक कोंडीत अडकून पडत असून, रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे बस धक्के खात धावत आहेत. त्यामुळे दुचाकीपेक्षा कमी वेगात बस धावत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय 

अडचणींवर मात करीत अखेर बीआरटी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रत्येक मिनिटाला बस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था समक्ष होऊन नागरिकांचा खासगी वाहनांकडे असलेला कल कमी होणार आहे.  2 वर्षांत मेट्रोचे कामही पूर्ण होऊन नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सेवेचे शहरातून स्वागत केले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात सर्व प्रकाराच्या उपाययोजना केल्या  आहेत, असे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.