Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Pune › मेट्रो पिलरवर ‘व्हर्टिकल गार्डन’

मेट्रो पिलरवर ‘व्हर्टिकल गार्डन’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : मिलिंद कांबळे 

नागपूर मेट्रोच्या तसेच, पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर करण्यात आलेल्या व्हर्टिकल गार्डनच्या धर्तीवर पुणे मेट्रोच्या पिलरवरही तशी हिरवळ विकसित केली जाणार आहे. मेट्रो स्थानकात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून ते या हिरवळीसाठी वापरले जाणार आहे. परदेशात अंगीकारला गेलेला हा  ‘इको-फे्रन्डली’ प्रकल्प पर्यावरणपूरक आहे.
पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या एकूण 31.25 किलोमीटर अंतराच्या  मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यापैकी रेजहिंल्स ते स्वारगेट हा केवळ 5 किलोमीटर मार्ग भुयारी आहे. उर्वरित सर्व मार्ग हा एलिव्हेटेड आहे. त्यात पिंपरी ते दापोडी मार्गावर वेगात काम सुरू असून, 60 पेक्षा अधिक पिलर उभे राहिले आहेत. 

मेट्रो कामात अडथळा ठरणारे अनेक वृक्षांचे दुसरीकडे नेऊन पुर्नरोपण केले जात आहे. तसेच, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन शेकडो झाडे लावली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रोच्या पिलरवर व्हर्टिकल गार्डनची संकल्पना राबवली जाणार आहे. वेगवेगळ्या जातीचे छोट्या रोपांच्या कुंड्या पिलरवर लावून ती जगवली जाणार आहेत. पिलरमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत दुभाजक बनवून त्यावर झाडे लावली जाणार आहेत. पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचनचा पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे खूप कमी प्रमाणात पाणी खर्ची पडणार आहे. मेट्रो कामासाठी पिंपरी ते दापोडी मार्गावर तोडण्यात आलेले दुभाजक पुन्हा हिरवेगार दिसणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजन वाढून रस्त्यावरून ये-जा करताना शुद्ध हवा मिळणार आहे. 

या गार्डनसाठी मेट्रो स्थानकाचे पाणी वापरले जाणार आहे. स्थानकावर वापरले गेलेले पाण्याचा पुर्नवापर करून ते या गार्डनसाठी वापरले जाईल. पर्यायाने पालिकेच्या पाण्याची बचत होणार आहे. तसेच, पिलरला रंगकामाचा खर्च वाचणार असून, त्याचे आयुष्यमान वाढीस मदत होणार आहे.  

मेट्रो पर्यावरणपूरक

नागपूर मेट्रोच्या धर्तीवर पुणे मेट्रोच्या पिलरवरही व्हर्टिकल गार्डन विकसित केले जाणार आहे. त्यातून पर्यावरण संवर्धनाचा हेतू आहे. त्यासाठी वापरले जाणारे पाणीही मेट्रो स्थानकावरील पाण्याचा पुर्नवापर केलेले असेल. त्याचपद्धतीने वीज निर्मितीसाठी स्थानक व मेट्रोच्या सीमा भिंतीवर सोलर पॅनेलही बसविण्यात येणार आहे. त्याचा वापर मेट्रो स्थानकांसाठी केला जाणार आहे. स्थानकावर दिवसा अधिकाधिक नैसर्गिक प्रकाशव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न आहे. कामात अडथळे असलेल्या वृक्षाचे यशस्वीपणे पुर्नरोपण केले जात आहे. मेट्रो प्रवाशांसह इतर नागरिकांनाही शुद्ध हवा मिळावी म्हणून सर्वोतोपरी नियोजन केले जात आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

 

Tags : Pimpri, Pimpri news, metro, Vertical garden, 


  •