Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Pune › वाहने ‘झेब्रा क्रॉसिंग’वर; पादचारी रस्त्यावर 

वाहने ‘झेब्रा क्रॉसिंग’वर; पादचारी रस्त्यावर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मोशी  : श्रीकांत बोरावके 

सिग्नलवर असलेले काळे-पांढरे पट्टे अर्थात झेब्रा क्रॉसिंग हे पादचार्‍यासाठी  असतात, याचा विसरच वाहनधारकांना पडलेला असतो म्हणूनच की काय थेट झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवण्याची सवयच वाहनधारकांना जडली आहे.देहू - आळंदी बीआरटी रस्त्यावरील चिखलीपासून ते आळंदी तसेच पुणे - नाशिक महामार्ग भारतमाता चौकातील सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगचे रंग उडाले, जेथे काळे-पांढरे पट्टे आहेत त्यावर थांबणार्‍या  वाहनधारकांवर दंडाची तरतुद असतानाही  वाहतूक पोलिसांकडून मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याशिवाय सिग्नल तोडणे व विरुद्ध दिशेने यू टनर्र् घेणे यांसारखे वाहतुकीचे नियमही वाहतूक पोलिसांच्या साक्षीने पायंदळी तुडविले जात असून, पोलिसांचा धाकच न उरल्याचा प्रत्यय चौकांचौकात दिसून आला आहे. त्यामुळे वाहने झेब्रा क्रॉसिंगवर... अन् पादचारी रस्त्यावर अशी अवस्था रस्त्यावर झाली आहे.

मोशी टोल नाका ते जय गणेश साम्राज्य चौकापर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. देहूरस्ता या सिग्नलवर काळे-पांढरे पट्टे असलेले झेब्रा क्रॉसिंग अत्यावश्यक मानले जाते. वाहनधारकांनी वाहने थांबविताना ती झेब्रा क्रॉसिंगच्या आतच थांबवावी, जेणेकरून रस्ता ओलांडणार्‍या  पादचार्‍यांना  झेब्रा क्रॉसिंगचा वापर सुलभ होईल. रस्त्यावरील सर्व वर्दळीच्या आणि फारशी वर्दळ नसलेल्याही काही निवडक सिग्नलची पाहणी केली असता, झेब्रा क्रॉसिंग हे पादचार्‍यासाठी आहेत आणि त्यावर वाहने उभी केली तर दंडाची शिक्षा आहे, असा काही नियम असल्याची माहितीच वाहनधारकांना नसल्याचे पाहणीत आढळून आले.

येथील बीआरटी रस्त्यावरील सर्व चौकांतील सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगचे काळे-पट्टे गायब झाले असून, काही ठिकाणी रंग उडाले आहेत.त्यामुळे वाहनधारक थेट सिग्नलच्याही पुढे जाऊन वाहने थांबवत असल्याने पादचार्‍यांना रस्ता ओलांडताना  कसरत करावी लागते. झेब्रा क्रॉसच्या आत न थांबल्यास संबंधित वाहनधारकाला शंभर रुपये दंड भरावा लागतो; परंतु वाहतूक पोलिसांच्या समोर झेब्रा क्रॉसिंगवर वाहने बिनधास्त उभी केली जात असतानाही पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर सर्व सिग्नलवरील झेब्रा पट्टे नव्याने मारण्याची गरज आहे. झेब्रा क्रॉसिंगचा प्रकार सर्वत्र घडत असताना, सिग्नलवर ड्यूटी बजावणार्‍या वाहतूक पोलिसांच्या सक्षम वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. पोलिसांना न जुमानता सिग्नल तोडण्याचे वाढते प्रमाण आणि पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांच्यावर अरेरावी करण्याचे प्रकार पाहता बेशिस्त वाहनधारकांना वर्दीचा धाकच उरला नसल्याचे निदर्शनास आले आहे. सिग्नलवर चौकात झेब्रा क्रॉसिंगचे नियम मोडणे, मोबाईलवर  बोलणे, ट्रिपल सीट जाणे, वन-वे मार्गाचा दुरूपयोग, वेगाने दुचाकी चालविणे, नो-पार्किंग झोनमध्ये वाहने लावणे, रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, सिग्नल पडण्यापूर्वीच वाहन हाकणे यांसारखे बेशिस्तीचे अनेक नमुनेही पाहणीत दिसून आले .

Tags : Pune Pimpri, Pimpri News, Vehicles,  Zebra Crossing, Pedestrian, street


  •