Thu, Apr 25, 2019 08:06होमपेज › Pune › दहशत बसवण्यासाठी वाहने, एटीएमची तोडफोड

दहशत बसवण्यासाठी वाहने, एटीएमची तोडफोड

Published On: Dec 29 2017 1:37AM | Last Updated: Dec 29 2017 1:34AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

वारजे येथील वाहन तोडफोडीची आणि तळजाई येथील वाहनांच्या सीट ब्लेडने फाडल्याची घटना ताजी असतानाच एकाने स्वत:ला परिसरातील भाई म्हणवून घेण्यासाठी साथीदारांसह मिळून हांडेवाडी रोडवरील इंदिरानगर येथे वाहनांची व एटीएमची तोडफोड करत दहशत पसरवली. एवढेच नव्हे, तर या सराईतांनी परिसरातील नागरिकांना व महिलांना मारहाण केली व भाई म्हणण्यासाठी धमकावत ते पसार झाले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. यावेळी परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर इतर पाच जणांचा शोध सुरू आहे. 

फिरोज दिलदार पठाण ऊर्फ मुन्ना (32, रा. हडपसर), इम्रान ईर्षाद जमादार (28, रा. हडपसर), शरद रावसाहेब अहिरे  (20, रा. बाणेर)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.  राज गुलाब शेख, सोनू मुजावर, असीफ शेख, अखिल शेख, तावीज शेख यांचा पोलिस शोध घेत आहेत. यातील राज शेख याच्याविरोधात अब्दुल रहेमान इब्राहिम शेख (74, दुगडचाळ, इंदिरानगर, हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल रहेमान शेख हे हांडेवाडी रोड येथील इंदिरानगर परिसरात राहण्यास असून घराजवळच ते एका आंब्याच्या झाडाजवळ हातगाडीवर भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. तर यातील गुन्हा दाखल करण्यात आलेला राज गुलाब शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला वस्तीतील सर्वांनी भाई म्हणावे, तसेच त्याचे ऐकावे असे त्याचे म्हणणे होते. मात्र परिसरातील सर्वजण त्याला राज नावाने हाक मारतात. याचा त्याला राग होता. दरम्यान बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी हे तेथे भाजीविक्री करत असताना याच कारणावरून तो आणि त्याचे इतर सात साथीदार हातात लोखंडी रॉड, पाईप आणि लाकडी बांबू, तसेच काठ्या घेऊन आरडाओरडा करत आले.

येतानाच त्यांनी रस्त्याशेजारील पार्किंगचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि तेथे पार्क केलेल्या तीन स्कूलबस, दोन रिक्षा आणि तीन कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर रस्त्यावर येऊन आरडाओरडा करत हातातील रॉड हवेत फिरवून मी इथला भाई आहे, असे म्हणत नागरिकांना धमकावले. रॉड फिरवत असताना तो त्याच्या दोन साथीदारांना लागून ते खाली पडले. त्यानंतर त्याने लगेच तेथील एका एटीएमची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून सैरावैरा पळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे टोळके शेजारील एका गल्लीत घुसले. तेथील लोकांची एकच धांदल उडाली.

ते सर्वजण नंतर फिर्यादी यांच्याजवळ येऊन थांबले. राज शेखने त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. फिर्यादी यांच्या मुलीने मध्यस्थी केली असता तिच्याशीही झटापट केली. या झटापटीत तिचे मंगळसूत्रही गहाळ झाले. त्यानंतर तो फिर्यादींकडे येऊन, बुढ्ढे तुझे जादा मस्ती है, तुमको अभी दिखाता हूँ, असे म्हणून ढकलून खाली पाडले. तसेच त्यांची हातगाडी उलथून टाकली. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोवर ते सर्वजण पसार झाले होते. दरम्यान, काही वेळाने शेजारील इमारतीतील महिला आली. हे टोळके  काही वेळापूर्वी तिच्या घरात घुसले. घरातील सामानाची नासधूस करून महिलांना मारहाण केली, असे तिने पोलिसांना सांगितले.