Wed, Jul 17, 2019 08:16होमपेज › Pune › महिलेच्या सतर्कतेने वाहनांनी चिरडेल्या तरूणांस जीवनदान

महिलेच्या सतर्कतेने वाहनांनी चिरडेल्या तरूणांस जीवनदान

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:53AMखडकवासला : दत्तात्रय नलावडे  

प्रचंड वाहतूक  कोंडी असलेल्या सिंहगडरोडवरील धायरी गणेश नगर येथे मुख्य  रस्त्यावर वाहनांखाली चिरडून गंभीर जखमी   होऊन बराच वेळ  बेवारस  अवस्थेत पडलेल्या तरूणाचे प्राण वाचविण्यासाठी रणरागीणी महिलेसह तरूण   धावून आले.  त्यांनी रस्त्यावर  पडलेल्या  गंभीर जखमी  तरूणाचे प्राण वाचवून  माणूसकीचे दर्शन घडविले. त्यामुळे  गंभीर जखमी तरूणाचे राजगड भागातील आई, वडील, नातेवाईक हेलावून गेले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  ही घटना गुरूवारी ( दि.23 ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी तरूणाचे  नाव सागर अंकुश गिरंजे  ( वय 27 , मुळ रा.सोंडे हिरोजी, राजगड पायथा, ता.वेल्हे, सध्या रा. धायरी ) असे आहे. त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर सिंहगडरोडवरील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सागर गिरंजे निपचित पडला होता. त्याची हालचाल नव्हती. तेथे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी पतीसोबत मोटरसायकलवरून धायरी येथे घरी चाललेल्या श्वेता भास्कर जोशी यांनी पती भास्कर यांना तेथे थांबवले.  त्यावेळी समोर राहणारे रणजित ऐवळे, नितीन साळुंखे व विश्वनाथ बेचावडे हे धावत आले. गंभीर जखमी सागर याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. प्रसंगावधान दाखवत श्वेता हिने गळ्यातील ओढणीने सागर याच्या डोक्याच्या जखमा  बांधल्या. त्यानंतर तेथून पुण्याकडे चाललेल्या रूग्णवाहिकेला  थांबवून सागरला घेऊन रणजित ऐवळे, भास्कर जोशी आदींनी सिंहगडरोडवरील हिंगणे खुर्द येथील जगताप हॉस्पिटलमध्ये नेले. बेशुद्ध अवस्थेत, गंभीर जखमी असलेल्या सागर याचे नातेवाईक अथवा मित्र नसताना धायरीकरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची विनंती डॉक्टरांना केली. क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरांनी सागरवर  उपचार  सुरू केले. तासाभरानंतर सागर शुद्धीवर आले. 

उपचार करणारे डॉ. म्हणाले, सागर याच्यावर उपचार करण्यास पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर त्याचे प्राण वाचले नसते.  सागरच्या मोबाईलमधून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर  सागरचे आई, वडील, नातेवाईक दुर्गम राजगड भागातील सोंडे हिरोजी येथून रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये आले. 

बेवारस अवस्थेत पडलेल्या गंभीर जखमी तरूणाचे प्राण वाचवून धायरीकरांनी माणूसकीचे दर्शन घडविले. यात श्वेता जोशी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्या   योगा क्लास चालवतात. मदत करणारे रणजित ऐवळे व इतर तरूण  सामान्य कुटुंबातील असून ते मजुरी करतात . 

रणजित ऐवळे म्हणाला, गणेशनगर येथे अज्ञात रिक्षा व दुचाकी वाहनांनी एका मोटारसायकलवरून  घरी चाललेल्या सागर यास धडक दिली. त्यानंतर सागर खाली पडला. त्यानंतर त्याला एका मोटारसायकलने  चिरडल्याने गंभीर जखमी झाला. आम्ही जवळ गेलो त्यावेळी सागर बेशुद्ध पडला होता. कोणीही त्याच्याजवळ येत नव्हते. ये जा करणारी वाहने भरधाव वेगाने निघून जात होती. बराच वेळ तो बेवारस अवस्थेत पडून होता. 

दरम्यान, सागर याच्या जिवाचा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे वडील अंकुश गिरंजे म्हणाले, माझ्या लेकराला मदत करण्यासाठी महिला, तरूण धावले. ते जणू देवदूत आहेत.सागर हा नांदेडसिटी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे. त्याला दोन लहान मुले आहेत, पत्नी, मुलांसह तो धायरी येथे रहात आहे. त्याचे आई, वडील सोंडे हिरोजी, राजगडला शेती करतात.या बाबत सिंहगडरोड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता या अपघाताची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.