Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Pune › भाजी विक्रेत्या आशाबाईंचा मुलगा बनला सीए

भाजी विक्रेत्या आशाबाईंचा मुलगा बनला सीए

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विकून परिस्थितीशी दोन हात केले. आईच्या या कष्टाचे चीज करीत जिद्द, मेहनत व सातत्याच्या बळावर नारायण केंद्रे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) बनला आहे. पुण्यातील विद्यार्थी सहायक समितीचा माझ्या यशात मोठा वाटा असल्याचे नारायण याने सांगितले.

मूळचा लातूर जिल्ह्यातील  अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी गावचा असलेल्या केंद्रे याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सीएची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली आहे. नारायणचे वडील बाबूराव केंद्रे यांचे 1997 मध्ये निधन झाले. नारायण त्यावेळी अवघ्या पावणेदोन वर्षांचा होता. पतीच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई आशाबाई यांच्यावर येऊन पडली. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अहमदपूर येथील भाजीमंडईत त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. आजही भाजीमंडईत त्यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. भाजीपाला विक्रीच्या दुकानावर नारायण बारावी होईपर्यंत आईला भाजीपाला विक्रीसाठी मदत करायचा.

नारायणचे प्राथमिक शिक्षण गावातील जि. प.  शाळेत, तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला आला व बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला. येथे विद्यार्थी सहायक समितीचा त्याला आधार मिळाला. एम. कॉम पूर्ण करून तिथले कॉमर्स या विषयात त्याने नेट परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. गरिबीची परिस्थिती बदलण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने यश मिळवले.

वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या धीराने केलेला संघर्ष लहानपणापासून पाहत आलो आहे. त्याची जाणीव ठेवून नेहमी चांगले काहीतरी करण्याची जिद्द उराशी होती. आई, माझे गुरु, मित्र या सगळ्यांचा या यशात वाटा आहे. 2013-15 या कालावधीत विद्यार्थी सहायक समितीत असताना अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याचा फायदा सीए करताना झाला.     - नारायण केंद्रे, सीए

पतीच्या निधनानंतर तीन मुलांना वाढवण्यासाठी आजवर जे कष्ट उपसले त्याचे फळ आता मिळाले आहे. नारायणने मिळवलेले यश माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. मी उपसलेल्या कष्टाचे त्याने चीज केले याचे समाधान आहे. - आशाबाई केंद्रे,नारायणची आई.