Mon, Jul 22, 2019 00:38होमपेज › Pune › प्राधिकरणातील वेदांगीची सायकलवर जगप्रदक्षिणा 

प्राधिकरणातील वेदांगीची सायकलवर जगप्रदक्षिणा 

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:00AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

प्राधिकरण, निगडी येथील 19 वर्षीय वेदांगी कुलकर्णी ही चक्‍क सायकलवर जगप्रदक्षिणा घालणार आहे. ही मोहिम ती कोणाच्या मदतीविना एकटीने पूर्ण करणार आहे हे विशेष. दररोज 320 किलोमीटर वेगाने 100 दिवसांमध्ये 5 खंडांतून एकूण 29 हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. भारतीय मुली साहसी क्रीडा प्रकारात मागे नसल्याचे या मोहिमेतून वेदांगीला दाखवून द्यायचे आहे. 

जून महिन्यात सुरू होणारी ही मोहिम  पाच टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा ऑस्ट्रेलियामधील पर्थ ते ब्रिस्बेन, दुसरा टप्पा न्यूझीलंडमधील वेलिंग्टन ते ऑकलँड, तिसरा टप्पा अँकरेज (अलास्का) ते मॉनर्टियल (कॅनडा) असा असेल. चौथ्या टप्प्यात पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, रशिया, मंगोलिया आणि चीन असं सायकलिंग करून शेवटचा आणि पाचवा टप्पा पुन्हा पर्थ आहे.  

इंग्लडच्या बोर्नमाउथ विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या दुसर्या वर्षाला शिकत असलेल्या वेदांगी संपूर्ण मोहिमेचे तपशील, छायाचित्र, व्हिडिओ चित्रीकरण स्वत:च करणार आहे. आवश्यक सराव चाचण्या, आहार, शारीरिक आणि मानसिक तंदुरूस्तीसाठी आवश्यक प्रशिक्षण घेण्यात वेदांगी सध्या व्यस्त आहे. त्याचप्रमाणे 78 दिवसांमध्ये सायकलवरून जगप्रवास करणारा मार्क बिऊमाँट आणि भारतातील अल्ट्रा सायकलिस्ट सुमित पाटील वेदांगीला मार्गदर्शन करत आहेत. 

या आधी जगात केवळ दोन तरूणींनी वयाच्या 30 व्या वर्षी असा प्रयत्न केला होता.कमीत कमी वेळात सायकलवरून जगप्रदक्षिणा करणारी सर्वांत तरुण महिला सायकलस्वार म्हणून तिची आणि तिच्या या प्रवासाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याच्या दिशेने या मोहिमेकडे पाहिले जात आहे. मोहिमेचा खर्च 52 लाख 70 हजार आहे.  

वेदांगीने जुलै 2016 मध्ये मनाली-खार्दुंगला-द्रास या भारतातल्या सर्वांत आव्हानात्मक रस्त्यावर एकटीने  सायकल प्रवास केला. बोर्नमाऊथपासून जॉन ओग्रोतस हा 1 हजार 900 किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवर केला. त्यानंतर इंग्लंडमध्येच नियमितपणे सायकलिंग सुरू केले. काही दिवसांपूर्वी तिने मुंबई ते दिल्ली हे 1 हजार 400 किलोमीटर प्रवास केला आहे. त्यासाठी तिला वडील विवेक कुलकर्णी बहुमोल पाठींबा व मार्गदर्शन मिळत आहे. 

मोहिमेसाठी विशेष सायकल

या मोहिमेत सायकलीचा वेग आणि तिची ठेवण हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे लंडनमधील आयसन वर्कशॉपमध्ये वेदांगीसाठी खास सायकल तयार होत आहे. तिच्या शरीराची ठेवण, वजन, वेग, पाच खंडातले हवामान आणि सर्व प्रकारच्या रस्त्यांचा अभ्यास करून ही सायकल तयार करण्यात येत आहे.

 

Tags : pune, pune news, Vedangi Kulkarni, bicycle, world,