Tue, May 21, 2019 12:21होमपेज › Pune › शेतकर्‍यांना माओवादी म्हणणार्‍या खा. महाजन यांनी माफी मागावी

शेतकर्‍यांना माओवादी म्हणणार्‍या खा. महाजन यांनी माफी मागावी

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:42PMपिंपरी : प्रतिनिधी

आपल्या न्याय्य मागण्यासाठी नाशिक ते मुंबईतील विधान भवनावर 200 किमीचा पल्ला पार करून मोर्चा काढणार्‍या शेतकर्‍यांना भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवाद्यांची उपमा दिली आहे. 

शेतकर्‍यांना नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे विधान निषेधार्ह असून, महाजन यांनी शेतकर्‍यांचा अवमान केला आहे. त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी  शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जगताप यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने नाशिक ते मुंबईतील विधान भवनावर 200 किलोमीटर लांबचा पल्ला पायी वारी करून मोर्चा काढला.

या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक उन्हाची तमा न बाळगता मोठ्या प्रमाणात सहभागी झाले असताना, या मोर्चेकर्‍यांना सत्ताधारी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी माओवाद्यांची उपमा दिली आहे. 

शेतकर्‍यांना नक्षली चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरी माओवाद शेतकरी आंदोलनातून डोकावत असल्याचे संतापजनक विधान त्यांनी केले आहे. महाजन यांनी राज्यातील बळीराजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी बळीराजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे. 

राज्य सरकार हे शेतकरी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देणे,  शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून शेतकर्‍यांची चेष्टा करत आहे. भाजप सरकारला आंदोलन केल्यानंतरच नेहमी जाग येणार का? सरकार म्हणून काही नैतिक जबाबदारी आहे की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.