Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Pune › जलसमाधी घेण्याचा वारकर्‍यांचा इशारा

जलसमाधी घेण्याचा वारकर्‍यांचा इशारा

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची तपोभूमी श्री क्षेत्र भंडारा व भामचंद्र डोंगरांचे पावित्र्य व अखंडत्व कायमस्वरुपी ठेवण्याच्या मागणीसाठी विश्‍व वारकरी सेनेने इंद्रायणीत जलसमाधीचा इशारा  दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 36 दिवसांपासून संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे शासनाच्या चित्तशुद्धीसाठी अखंड तुकाराम भजन संकीर्तन प्रबोधन आंदोलन सुरू आहे. 

खेड आणि मावळमधील श्रीसंत तुकाराम महाराज यांची तपोभूमी श्रीक्षेत्र भामचंद्र व भंडारा डोंगर महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असून, येथे चुकीच्या औद्योगिक विकासाला आणि बांधकाम व्यावसायिकांना शासनाने पाठीशी घातले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत, तो थांबविण्यात यावा, डोंगरावर सातत्याने उत्खनन सुरू असून,त्यामुळे डोंगराला तडे जात आहेत. परिणामी तुकोबांची गुहा आणि बुद्धाच्या लेण्यांना इजा पोहचत आहे. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतावरही विपरित परिणाम होत आहे. 

भामचंद्र डोेंगर बचाव वारकरी-शेतकरी संघर्ष समितीने अमेरिकन डाऊ केमिकल कंपनीविरुद्ध आंदोलन केले होते. त्यादरम्यान आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ते अद्यापही मागे घेण्यात आलेले नाही, ते मागे घेण्यात यावे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची तपोभूमी श्री क्षेत्र भंडारा व भामचंद्र डोंगर पायथ्यापर्यंत तीर्थक्षेत्र व राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे, यासह विविध मागण्या पुढील तीन आठवड्यात पूर्ण न झाल्यास  ह.भ.प.तुळशीराम महाराज रांजणे, दिंगबर पवार आणि दत्तात्रय शेट्टे यांनी इंद्रायणीच्या उगमापासून तुळापूरपर्यंत कुठेही जलसमाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.