Thu, Apr 25, 2019 04:06होमपेज › Pune › विविध संघटनांतर्फे छिंदम याच्या निषेधार्थ आंदोलन

विविध संघटनांतर्फे छिंदम याच्या निषेधार्थ आंदोलन

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:34AMपिंपरी : प्रतिनिधी 

भाजपचा पदाधिकारी आणि अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची वक्तव्ये केली. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवाजी महाराजांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने  पिंपरीत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी छिंदम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.
सध्याचे केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार दिलेली कोणतेही आश्‍वासन पूर्ण करत नाही. त्यामुळे या सरकारने जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणि सत्तेचा दुरुपयोग दाखवत महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले जात आहेत; मात्र संभाजी ब्रिगेड हे कधीही सहन करणार नाही. भाजपला जशास तसे उत्तर देऊ,  असा इशारा पवार यांनी दिला.

या वेळी पवार यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला केला. ते म्हणाले की, विकासाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार आपले अपयश झाकण्यासाठी  जाती-धर्मांमध्ये भांडण लावत आहे, तर अनेकांच्या अस्मितेची बदनामी करत आहे. शेतीमालाला हमीभाव देऊ, मराठा-धनगर समाजाला आरक्षण देऊ, महागाई कमी करू, एक कोटी तरुणांना रोजगार देऊ, आदी आदी पोकळ आश्‍वासने देऊन हे सत्तेवर आले आहेत. भाजप सरकारच्या काळात शेती परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.  या वेळी मारुती भापकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपनेही छिंदमच्या या वक्तव्याचा निषेध करायला हवा. महापालिकेमध्ये तसा ठराव त्यांनी संमत करायला हवा. हा ठराव न केल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन करू; तसेच त्यांना जनताही माफ करणार नाही.  

या वेळी मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी पिंपरी-चिंचवड अध्यक्ष प्रवीण कदम, सतीश काळे, प्रवीण बोर्‍हाडे, महेश ठोंबरे, सूरज साळुंखे, गुलाब पानपाटील, धनाजी येळ्कर, नरेंद्र बनसोडे, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे आदींसह अनेक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.