Mon, May 27, 2019 01:38होमपेज › Pune › वाल्हेकरवाडीचा प्रकल्प बिल्डर लॉबीमुळे रखडला

वाल्हेकरवाडीचा प्रकल्प बिल्डर लॉबीमुळे रखडला

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:33PMपिंपरी ः नरेंद्र साठे

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण वाल्हेकरवाडीत गृहप्रकल्प उभारत आहे. अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या प्रकल्पाला गेल्या वर्षी सुरुवात झाली खरी; परंतु अद्यापही हा गृहप्रकल्प केवळ प्राथमिक अवस्थेतच आहे. प्रकल्पास अगोदरच उशीर झाला आणि यात भर म्हणजे भूमिपूजनप्रसंगी झालेल्या वादामुळे चर्चेत आला. वर्षभरापासून बांधकाम अतिशय संथ गतीने सुरू असून, हा प्रकल्प रखडण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 आणि 32 मध्ये सध्या 792 सदनिकांच्या गृहयोजनेचे काम सुरू आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची 1972 साली कामगारांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापना झाली; परंतु सध्या प्राधिकरण त्याच्या मूळ उद्देशापासूनच दूर जात असल्याचे दिसते; कारण मागील वीस वर्षांमध्ये प्राधिकरणाकडून एकही गृहप्रकल्प पूर्ण झालेला नाही. प्राधिकरण बांधकाम व्यावसायिकांच्या हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठीच प्राधिकरण त्यांचे स्वस्तातील गृहप्रकल्प तत्परतेने पूर्ण करत नाही.

परिणामी, नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांकडून घरे विकत घ्यावी लागतात. नागरिकांच्या हितासाठी प्राधिकरण सक्षमपणे केव्हा काम करणार, हा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात असला, तरी देखील प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पाकडे दुर्लक्ष होताना दिसते. पेठ क्रमांक 30 आणि 32 मध्ये सुरू असलेला गृहप्रकल्प एक वर्षानंतर केवळ वाहनतळाच्या बांधकामापर्यंतच गेला आहे. संथ गतीने काम सुरू असल्यामुळे ठेकेदाराला दंडही ठोठावला होता; परंतु परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. हा गृहप्रकल्प किमान एक ते दीड वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा शहरातील नागरिकांना आहे.

वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पासाठी मलेशियावरून अ‍ॅल्युफॉम फॉर्म आयात केले आहे. ग्राऊंडचे काम पूर्ण झाले आहे. वरील मजले बांधण्याचे काम वेगाने होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प पुढील एक ते दीड वर्षात पूर्ण होईल. यामध्ये एक बीएचकेच्या 414 आणि एक आरकेच्या 378 अशा एकूण 792 सदनिका असणार आहेत.  - अनिल सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

हा प्रकल्प 2014 मध्ये सुरू होणे आवश्यक होते; परंतु उशिरा सुरू झाला. नंतर  प्रकल्पाच्या कामास सुरुवात करून देखील कामाला वेग नसल्याने नियोजित वेळेत पूर्ण होणार नसल्याचे दिसते. प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी गृहप्रकल्पाच्या कामासाठी लक्ष देऊन कामाचा वेग वाढवणे आवश्यक आहे.  - विजय पाटील, अध्यक्ष, प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती

प्रत्येक सीईओ केवळ घोषणा करतो. अर्थसंकल्पात स्वस्त घरांसाठी तरतूद करतात;  परंतु सर्व निष्फळ. भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी भूमिपूजनाच्या वेळी प्रकल्पाला विरोध केला, त्याला आम्ही कडाडून विरोध केला. त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांची लॉबी देखील या सर्वाला कारणीभूत ठरत आहे. सध्या प्रकल्पाचा वेग पाहिला तर तो लवकर पूर्ण होणार नाही. असाच वेग राहिला, तर प्रकल्प रखडण्याचा देखील धोका आहे.  - काशीनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ