Tue, Mar 26, 2019 02:04होमपेज › Pune › वैदू समाजातील मुलीचे दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण

वैदू समाजातील मुलीचे दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण

Published On: Jun 10 2018 1:59PM | Last Updated: Jun 10 2018 1:59PMपिंपरी :  प्रतिनिधी

पारंपरिक प्रथांमध्ये गुंतून पडलेल्या वैदू समाज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजही शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे मुलींनी शिक्षण घेणे सद्यस्थितीत अशक्यप्राय गोष्ट आहे. परंतू या नकारात्मक विचारसरणीला डावलून वैदू समाजातील एका मुलीने अपार मेहनत घेतली. तिने दहावीच्या परिक्षेत नव्वद टक्के गुण मिळवून समाजातील इतर मुलींना एक वेगळी वाट दाखवली आहे. शिक्षणाबाबत नकार घंटा वाजवणार्‍या समाजात जन्मलेल्या संजना गणेश आंब्रे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळविले आहेत. वैदू समाजात ९० टक्के मिळविलेली ही पहिलीच मुलगी ठरली असून या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संजनाचे वडील गणेश आंब्रे आकुर्डी येथील आयकर विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत आहेत. आपल्या मुलीने शिकून खुप नाव कमवावे हि वडीलांची इच्छा संजनाने सार्थ ठरवली आहे. त्यामुळे वडीलांनाही मुलीचे विशेष कौतुक आहे. शिक्षण घेतले नाही तर वैदू समाजात दगड फोडणे, घरोघरी जाऊन भिक्षा मागणे अशी कामे करावी लागतात. त्यामुळे आपल्या लेकीवर अशी वेळ येऊ नये यासाठी मुलीला शिकवण्याचा ध्यास घेतला होता. संजनाने वडिलांची ही इच्छा पूर्ण केली. 

शाळेतून आल्यानंतर लिखाण व पहाटे दोन वाजता उठून अभ्यास असा दिनक्रम वर्षभर आखून संजनाने यशाला गवसणी घातली. संस्कृत हा आवडता विषय असून त्यात संजनाने  ९४ गुण प्राप्त केले आहे. आकुर्डी परिसरात व वैदू समाजात तिचे कौतुक होत आहे.