Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Pune › वढू बुद्रुकच्या ७ जणांना जामीन

वढू बुद्रुकच्या ७ जणांना जामीन

Published On: Jan 07 2018 2:10AM | Last Updated: Jan 07 2018 2:10AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

नगर रोडवरील वढू बुद्रुक गावातील गोविंद गायकवाड यांच्या समाधीच्या मोडतोडप्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यात अटक केलेल्या सात जणांची विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी शनिवारी जामिनावर सुटका केली. 

तक्रारदार सुषमा ओव्हाळ यांनी न्यायालयासमोर हजर राहून  ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची तक्रार मागे घेतली. त्यानंतर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. या प्रकरणी 49 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद काळूराम दाभाडे (22), अनुप राजाराम कोठावळे (30), रामदास ज्ञानोबा शिवळे (45), नवनाथ संपत कुंभार (30), सागर कांतीलाल अरगडे (21), ऋषिकेश गोरख अरगडे (19) आणि सोनेश भाऊसाहेब शिवळे (28, सर्व रा. वढू बुद्रुक, तालुका शिरूर, जि. पुणे) अशी त्यांची आहेत. आठ दिवस गावात जायचे नाही, अशी अट जामीन देताना घालण्यात आली आहे. या प्रकरणी सुषमा सुभाष ओव्हाळ (27, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती. 

शिरूर येथील वढू बुद्रुक गावातील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीवरील छत्री मोडत जातीय शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी 49 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी सात जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 

दरम्यान, दोन्ही बाजूंकडील लोकांमध्ये समेट झाल्याने तक्रार मागे घेण्याचा निर्णय झाला. तसेच गोविंद गायकवाड यांच्या समाधीची  दुुरुस्ती करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सुषमा ओव्हाळ यांनी न्यायालयासमोर हजर राहून त्यांची तक्रार मागे घेतली. त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.  या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. विलास पठारे यांनी कामकाज पाहिले; तर अर्जदारांकडून अ‍ॅड. अशोक संकपाळ आणि अ‍ॅड. चंद्रशेखर जाधव यांनी युक्तिवाद केला.